‘मविआ’ नेते राज्यातील प्रश्नांवर लक्ष देतील का? ः कानवडे मंत्री नवाब मलिक प्रकरणावरुन राज्य सरकारवर कठोर टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी थेट संबंध असल्याचे धागेदोरे ईडीच्या हाती लागताच दीर्घकाळ चौकशी करुन मंत्री मलिक यांना कोठडी सुनावली आहे. मलिक यांचे हे कृत्य देशविघातक व देशद्रोही आहे, त्यांच्या समर्थनार्थ सरकारमधील दिग्गज नेते, मंत्री आंदोलन करत आहेत हे कृत्य देशविघातक असल्याचा आरोप भाजपचे भाजपचे उत्तर नगर किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी केला आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष कानवडे म्हणाले, राज्यातील शेतकरी सर्वच बाजूंनी संकटात सापडला आहे. महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतीमालाला वेळेत पाणी उपलब्ध होत नाही, वीजबिलासाठी सरकार पठाणी वसुली करु पाहत आहे, दोन वर्षांपासून एसटीची चाके फिरले नाहीत, तीन महिन्याहून अधिक काळ एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे, शेकडो कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत तरीही सरकारला शहाणपण येतं नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर बाब आहे.

अडीच वर्षांच्या कालावधीत राज्य सरकारची कामगिरी पाहिली तर मंत्री महोदयांची शंभर कोटीची खंडणी वसुली, बलात्कार या प्रकरणात राजीनामा देऊन तुरुंगवास भोगत आहे. बाकी सत्तेतील मंत्री परीक्षा घोटाळे, बोगस शिक्षक भरती, कोरोना काळात कोविड सेंटर घोटाळे, पोलीस कर्मचारी बदल्या, सहकारी साखर कारखाने विक्री घोटाळे, मनी लॉड्रिंग, भूखंड घोटाळे या प्रकरणात व्यस्त आहेत. मात्र शेतकर्यांच्या उसाला एफआरपीची मागणी, दुधाला दरवाढ, शेतीमालाला योग्य भाव, अतीवृष्टीने शेतमालाचे झालेले नुकसान, पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाईस टाळाटाळ अशा अनेक शेतकर्यांच्या मागण्या धूळखात पडल्या आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वेळ नाही किंवा त्यांची इच्छाशक्ती नाही. आणि एका देशविघातक, देशद्रोही कृत्य करणार्या मंत्री नवाब मलिकच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, ही खूप मोठी शोकांतिका आहे असे कानवडे म्हणाले. मंत्री नवाब मलिक यांनी अल्पसंख्याक समाजाचा विकास न करता स्वतःचा विकास करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बेनामी मालमत्ता सरकार जमा होऊ नये म्हणून आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे या देशविघातक कृत्य करणार्या मलिक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरीत राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील कानवडे यांनी केली आहे.
