विशेष मतदार नोंदणीचा नवमतदारांनी लाभ घ्यावा! रविवारी मतदार नोंदणी करण्याची शेवटची संधी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नजीकच्या काळात होऊ घातलेल्या विविध निवडणूकांमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे नवमतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या मोहिमेतंर्गत अधिकाधिक नवमतदारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, नायब तहसीलदार विनोद गिरी यांनी केले आहे.

या मोहिमेतंर्गत 1 जानेवारी, 2022 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणार्या कोणत्याही नागरिकाला मतदार म्हणून आपले नाव नोंदविता येणार आहे. नाव नोंदणीसाठी संपूर्ण मतदार संघात मतदान केंद्रनिहायकेंद्रस्तरीय अधिकार्यांची नियुक्ति करण्यात आली आहे. 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याने आगामी निवडणूकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादी आपली नावे नोंदवावीत. तसेच राजकीय पक्ष, पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक संस्था यांनी मतदार जागृती करावी असे आवाहनही करण्यात आले आहे. मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका 2022 मध्ये होणार आहेत. त्यासाठी 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 27 व 28 नोव्हेंबर यादिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यात नाव नोंदणीसह यादीत पूर्वीपासून नावे असलेल्या मतदारांना आपल्या नावातील दुरुस्ती करता येणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणार्या कोणतीही व्यक्ति स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार नाही. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 1 ते 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत मतदार जागृती राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत अधिकाधिक मतदारांनी आपली नावे नोंदवावीत, तसेच आपल्या भागातील अथवा कुटुंबातील मयत व्यक्ति, दुबार, समान नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आपल्या भागातील बी.एल.ओ अथवानिवडणूक शाखेत विहित नमुन्यात अर्ज दाखल करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे.
