महावितरण कार्यालयात बाळासाहेब मुरकुटेंचा आत्महत्येचा प्रयत्न शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडल्याचा निषेध करत चार तास दिला ठिय्या

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील शेतकर्‍यांचे वीज जोडणी तोडल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यालयामध्ये मुख्य अभियंत्यांसमोरच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मंगळवारी (ता.23) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने वीजबिल थकबाकीचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

भाजप नेवासा तालुका व शेतकर्‍यांच्यावतीने मंगळवारी विद्युत कंपनीच्या कार्यालयामध्ये सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. मुरकुटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास विनंती केली की, आज शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकर्‍याकडे कुठलेही पिक सध्या हातात नाही. साखर कारखाने नुकतेच चालू झाल्यामुळे अजून शेतकर्‍याकडे ऊसाचेही पेमेंट आले नाही. त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी. मात्र, वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे वातावरण तापले. त्यानंतर नेवासाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तिथे दाखल झाले. त्यांनीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर तोडगा न निघाल्याने मुरकुटे यांनी विद्युत कंपनीच्या कार्यालयामध्येच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील शेतकरी व आंदोलक यांनी तत्काळ मुरकुटे यांना पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, वीजबिल थकबाकीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी न भरल्यास सध्या वीज कनेक्शन कापण्यात येत आहे. यात शेतकर्‍यांची मोठी कोंडी झाली आहे. याच मुद्द्यावर भाजपकडून नेवाशात आंदोलन करण्यात आले होते.

Visits: 174 Today: 2 Total: 1114469

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *