विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये निर्माण करणारे नवीन प्रवाह निर्माण व्हावे ः आ.लहामटे
विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये निर्माण करणारे नवीन प्रवाह निर्माण व्हावे ः आ.लहामटे
अकोले येथे स्मार्ट एज्युकेशन शाखेचे मोठ्या दिमाखात उद्घाटन संपन्न
नायक वृत्तसेवा, अकोले
बेरोजगारी निर्माण करणार्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदलाची गरज असून कौशल्ये निर्माण करणार्या स्मार्ट एज्युकेशनद्वारे नवीन शैक्षणिक प्रवाह निर्माण व्हावेत अशी अपेक्षा आमदार डॉ.किरण लहामटे यांनी येथे व्यक्त केली.
अकोले येथील अगस्ति विद्यालयात रविवारी पार पडलेल्या स्मार्ट एज्युकेशन साताराच्या अकोले शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर स्मार्ट एज्युकेशन सातारा संस्थेचे संस्थापक डी.वाय.पवार, संचालक सुहास साळुंके, विनायक ताजणे, अगस्ति शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी, अगस्ति विद्यालयाचे मुख्याध्यापक गीताराम अभंग, स्मार्ट एज्युकेशन अकोलेच्या संचालिका कल्याणी नवले उपस्थित होत्या.
अकोले शाखेच्या संचालिका कल्याणी नवले म्हणाल्या, उपेक्षित, वंचित व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे करिअर घडावे म्हणून हा उपक्रम सुरू केला असून अकोले शाखा या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्नशील राहील. स्मार्ट एज्युकेशन सातारा संस्थेचे संचालक सुहास साळुंके म्हणाले, पालकांनी आपल्या मुलांमध्ये तुलना करू नये. प्रत्येक मुलामध्ये वेगळे वेगळे कौशल्ये असतात. विद्यार्थ्यांना जर योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते नक्कीच यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करतील. अगस्ति एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी म्हणाले, कल्याणी नवले शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षिका आहेत. विद्यार्थ्यांप्रति असलेली त्यांची तळमळ व त्यांना भरभरून देण्याची वृत्ती यामुळे हे विद्यार्थी भारताचे समर्थ नागरिक होतील.
याप्रसंगी स्मार्ट एज्युकेशनचे अहमदनगर विभाग प्रमुख विनायक ताजणे यांनीही स्मार्ट एज्युकेशनमध्ये असणार्या प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी लोणी शाखेचे विकास अधिकारी आकाश काठे, दीपाली म्हस्के, वाल्मिक म्हस्के उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.हेमंत मंडलिक यांनी तर आभार प्रदर्शन संगमनेर शाखेच्या शुभदा सांबरे यांनी केले.