भंडारदरा धरणाचा विक्रम; यावर्षी तिसर्यांदा पूर्ण क्षमतेने भरले अतिरिक्त पाणी झाल्यास जलसंपदा विभाग प्रवरा पात्रात विसर्जित करणार
नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अहमदनगर जिल्ह्याची शान समजले जाणारे 11 दलघफू (टीएमसी) क्षमता असलेले ब्रिटीशकालीन भंडारदरा धरण पुन्हा एकदा मंगळवारी (ता.23) सकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाचा साठा 11 हजार 39 दलघफू कायम ठेऊन जादा झालेले पाणी प्रवरा नदीपात्रात विसर्जित करण्यात येणार असल्याची माहिती भंडारदरा धरण शाखेकडून मिळाली आहे.
अकोले तालुक्याच्या पश्चिमेला असणार्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने आपला हिसका दाखविल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली होती. त्यावेळी घाटघर येथे विक्रमी 76 मिमीटर पावसाची नोंद झाली होती. तसेच धरणाच्या पाणलोटातील इतर ठिकाणीही पावसाने दमदार हजेरी लावली होती. रविवारी संध्याकाळी व सोमवारी दुपारी पुन्हा भंडारदरा व परिसरात अवकाळी पावसाने कहर केला. परीणामतः भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढच होत राहिल्याने धरणाचा पाणीसाठा 11 हजार 39 दलघफू पोहोचला असून भंडारदरा धरण तिसर्यांदा भरले आहे. या अगोदर धरण तांत्रिकदृष्ट्या 11 सप्टेंबरला भरले होते. तर 12 सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच 23 नोव्हेंबरला पुन्हा धरणाचा पाणीसाठा 11 हजार 39 दलघफूटावर पोहोचल्याने भंडारदरा धरण तिसर्यांदा भरल्याचा धरणाच्या इतिहासातील विक्रम ठरला आहे.
गत चोवीस तासांत भंडारदरा येथे 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर पांजरे येथे 10 मिलीमीटर पाऊस पडला. वाकी व रतनवाडी येथे मात्र पाऊस पडला नसल्याने येथील पावसाची आकडेवारी निरंक आली आहे. भंडारदरा धरणात होणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढतच राहिल्यास धरणाच्या सांडव्यातून धरणाचा पाणीसाठा 11 हजार 39 दलघफू कायम ठेऊन जादा झालेले पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांच्या अधिपत्याखाली धरण शाखाधिकारी अभिजीत देशमुख यांनी दिली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यावर प्रकाश चव्हाण व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.