शिक्षण घेताना कायद्याचे ज्ञान घेणे गरजेचे ः न्या. खाडे कन्या विद्या मंदिरातील कायदेविषयक शिबिर उत्साहात

नायक वृत्तसेवा, अकोले
विद्यार्थ्यांच्या हातात देशाचे भवितव्य असल्याने त्यांनी सुजाण नागरिक बनावे. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे आवाहन करीत शिक्षण घेताना कायद्याचे ज्ञान घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अकोले न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश सचिन खाडे यांनी केले.

अकोले तालुका विधी सेवा समिती व अकोले तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने बालदिनाच्या पार्श्वभूमीवर कन्या विद्या मंदिर अकोले येथे कायदेविषयक शिबिर पार पडले. तसेच बालदिन साजरा करण्यात आला याप्रसंगी न्यायाधीश खाडे बोलत होते. यावेळी अकोले वकील संघाचे अध्यक्ष तथा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव अॅड.भाऊसाहेब गोडसे, संस्थेचे माजी सचिव तथा ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.के.बी.हांडे, आर.डी.नवले, मंगला हांडे, आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.के.जेडगुले, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना न्यायाधीश खाडे म्हणाले, संपूर्ण देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने तज्ज्ञ व्यक्ती, वक्ते येत असतात, त्यांच्या माध्यमातून आपला विकास होत असतो. त्यातूनच आपण घडत असतो. कर्मवीर भाऊराव अण्णांनी रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावले, त्याला खतपाणी लक्ष्मीबाई पाटील यांनी स्वतःचे दागिने विकून घातले. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. शिक्षण हे आपल्या विकासाचे माध्यम आहे. विद्यार्थी व कायदा यांचा घनिष्ठ संबंध असून कायद्याने विद्यार्थ्यांना हक्क दिले असून ते हक्क मिळविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. शिक्षण घेताना कायद्याचेही ज्ञान घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक जेडगुले यांनी केले. सूत्रसंचालन अमोल वैद्य यांनी केले तर आभार मंगल कर्पे यांनी मानले.
