ब्राह्मणवाड्याच्या बाप-बेट्याला जन्मठेप! सख्ख्या भावाचा खून; अडीच वर्षांपूर्वी घडली होती घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पूर्वी मुंबईत राहणार्या मात्र काही वर्षांपूर्वी मूळगावी परतलेल्या इसमाने आपल्या आईचे दागिने गहाण ठेवणार्या सख्ख्या भावाबाबत अपशब्द काढल्याचा राग मनात धरुन भावानेच आपल्या मुलासह एकाच दिवसांत दोनवेळा सशस्त्र हल्ला करीत त्याचा जीव घेतला. 2022 साली घडलेल्या या घटनेत अकोले पोलिसांनी बाप-बेट्यासह दोन महिलांवर खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली होती. या प्रकरणाचा खटला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुरु असताना जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आज या प्रकरणाचा निकाल दिला असून भावाचा खून करणार्या मार्तंड मनोहर आरोटेसह त्याचा मुलगा मयूर याला जन्मठेप व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोन्ही महिलांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
अडीच वर्षांपूर्वी 11 मार्च 2022 रोजी सदरचा प्रकार अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे घडला होता. घटनेच्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास मुंबईत रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे रवींद्र मनोहर आरोटे व त्यांची पत्नी ललिता हे दोघे ब्राह्मणवाड्यातील त्यांच्या शेतात ज्वारी काढण्यासाठी उपनेरची वाट बघत असताना मयत रवींद्र यांची आई राधाबाई यांनी त्यांचा दुसरा मुलगा मार्तंड याने गहाण ठेवलेले दागिने वारंवार सांगूनही परत आणले नसल्याचे त्यांना सांगितले. त्यावर मयत रवींद्र यांनी ‘तु त्याला दागिने देताना विचार करायचा होता, आता काय उपयोग? तो फुकट्याच आहे..’ असे प्रत्युत्तर दिले. या दोघात सुरु असलेला संवाद तेथून जवळच असलेल्या गायींच्या गोठ्याजवळ उभ्या असलेल्या आरोपी मार्तंडने ऐकला आणि तो तडक कुर्हाड घेवून त्यांच्याजवळ आला.
त्यावेळी त्याने शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घातला. त्यांची पत्नी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत असतानाच आरोपीने त्यांनाही लाडकी दांड्याने मारहाण केली. हा प्रकार सुरु असताना त्यांच्या भावकीतील अन्य लोकांनी मध्यस्थी करुन त्यांची भांडणं सोडवली व जखमी रवींद्र आरोटे यांना गावातील दवाखान्यात नेले. तेथे उपचार घेवून दोघे पती-पत्नी पुन्हा घरी आले. सायंकाळी पाचच्या सुमारास उपनेरवाला आल्याने दोघेही पुन्हा जवळच असलेल्या शेतात गेले असता आरोपी मार्तंड, त्याची पत्नी शंकुतला, मुलगा मयूर व त्याची बायको सोनाली हे चौघेही तेथे आले.
त्यावेळी मार्तंडच्या हातात लाकडी दांडा तर मयूरच्या हातात फावडे होते. त्या दोघांनी पुन्हा शेतात असलेल्या रवींद्र आरोटे यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता शंकुतला व सोनाली आरोटे यांनी त्यांना ढकलून दिले. या दरम्याने मार्तंडने आज याला मारुनच टाकू अशी धमकी दिल्याने जीवाच्या भयाने रवींद्र आरोटे तेथून घराकडे पळाले व पडवीत जावून थांबले. आरोपींनीही त्यांचा पाठलाग केला आणि घराच्या पडवीत जावून पुन्हा त्यांना लाकडी दांडा आणि फावड्याने बेदम मारहाण केली.
त्यात ते रक्तबंबाळ झाल्यानंतर ते दोघेही तेथून निघून गेले. जखमी रवींद्र यांना अन्य नातेवाईकांच्या मदतीने सुरुवातीला ब्राह्मणवाडा व नंतर आळेफाटा येथे उपचारार्थ नेण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अकोले पोलिसांनी आरोपी मार्तंड मनोहर आरोटे, त्याची पत्नी शंकुतला, मुलगा मयूर व सून सोनाली यांच्यावर खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन चौघांनाही अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास अकोल्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे यांनी पूर्ण करुन चौघांविरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदरचा खटला अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर चालला. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील बी.जी.कोल्हे यांनी सात साक्षीदार तपासले. जखमी रवींद्र आरोटे यांच्यावर घटनेच्या दिवशी दोनवेळा उपचार करणारे डॉक्टर, फिर्यादी व अन्य साक्षीदारांनी दिलेली साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली. शिवाय सरकारी वकील बी.जी.कोल्हे यांनी केलेला प्रबळ युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपी मार्तंड मनोहर आरोटे व त्याचा मुलगा मयूर मार्तंड आरोटे या दोघांना दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर, सबळ पुराव्याअभावी शंकुतला मार्तंड आरोटे व सोनाली मयूर आरोटे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्याकडे संपूर्ण अकोले तालुक्याचे लक्ष लागले होते.