संगमनेर नगरपालिकेत असतील आता ‘तीस’ नगरसेवक! शासनाच्या निर्णयानुसार दोन नगरसेवकांची वाढ; फेब्रुवारीत होणार निवडणुका..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
डिसेंबरमध्ये मुदत संपणार्‍या संगमनेर नगरपालिकेच्या विद्यमान कौंसिलची निवड लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेच्या कामाला अजूनही मुहूर्त लागलेला नसल्याने पालिकेची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक प्रक्रीया पूर्ण होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. त्यामुळे पालिकेच्या नवीन कौंसिलच्या निवडीसाठी आता पुढील वर्षीचा फेब्रुवारी उजेडणार आहे. त्यासोबतच राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे महापालिकांसह नगरपालिका व नगरपंचायतींच्या नगरसेवकांमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने संगमनेर नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या आता 28 वरुन 30 होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

2016 पासून अस्तित्वात असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या विद्यमान कौंसिलची मुदत पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे. मात्र गेल्या वर्षभर जिल्ह्यात कोविडने अक्षरशः थैमान घातल्याने मुदतीपूर्वी निवडणुका होतील का याबाबत प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू करण्यासही विलंब झाला. त्यातच यापूर्वीच्या भाजप-सेना युतीच्या सरकारने स्वीकारलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करुन सुरुवातीला एकसदस्यीय वॉर्ड पद्धती तर नंतर त्यातही बदल करुन द्विसदस्यीय प्रभाग पद्धती स्वीकारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. या सर्व प्रक्रियेत मोठा कालावधी निघून गेल्याने यावर्षी डिसेंबर अखेर मुदत संपणार्‍या महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका मुदतीपूर्वी होणार नाहीत हे स्पष्ट झाले होते.

संगमनेर नगरपालिकेच्या विद्यमान कौंसिलची मुदत संपण्याचा कालावधी अवघ्या महिन्यावर येवून ठेपला असला तरीही नव्याने घेण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रत्यक्ष कामाला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे पालिकेची निवडणूक आता पुढील वर्षी फेब्रुवारीतच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यातच 2016 साली निवडून आलेल्या सदस्यांची संख्या निश्चित करताना 2011 सालची जनगणना गृहीत धरण्यात आली होती. कोविड प्रादुर्भावामुळे 2021 साली होणारी जनगणना होवू न शकल्याने शहरीभागातील लोकसंख्या वाढलेली असतांनाही त्याबाबतची नेमकी माहिती व आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे यावर्षीच्या अखेरीस मुदत संपणार्‍या महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या किमान व कमाल सदस्य संख्येत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने 2 नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 9 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार ‘अ’ वर्ग नगरपालिकांमधील परिषद सदस्यांची संख्या किमान 40 इतकी तर 1 लाख लोकसंख्येच्या पुढील प्रत्येक 8 हजार लोकसंख्येसाठी अतिरीक्त एका सदस्याची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यातून वाढणार्‍या संख्येमुळे एकूण परिषद सदस्यांची संख्या 75 पेक्षा अधिक नसावी असे बंधन घालण्यात आले आहे. ‘ब’ वर्ग नगर परिषदांसाठी निवडून आलेल्या एकूण सदस्यांची संख्या सध्या 25 इतकी असून अध्यदेशानुसार 40 हजारांपुढील प्रत्येक 5 हजार लोकसंख्येसाठी आणखी एक अतिरिक्त नगरसेवकाची निवड करावी लागणार आहे. मात्र ‘ब’ वर्गात मोडणार्‍या कोणत्याही नगरपरिषदेची एकूण सदस्यसंख्या 37 पेक्षा अधिक नसेल. ‘क’ वर्ग नगरपरिषदांसाठीही किमान 20 परिषद सदस्यांची मर्यादा होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला असून 25 हजार लोकसंख्येपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक तीन हजार लोकसंख्येला एका सदस्याची वाढ होणार आहे. ‘क’ वर्ग नगरपरिषदांमध्ये एकूण सदस्यांची संख्या 25 पेक्षा अधिक नसेल.

या नव्या शासन निर्णयामुळे ‘ब’ वर्गात मोडणार्‍या संगमनेर नगरपरिषदेच्या एकूण सदस्य संख्येत वाढ होवून ती आता 30 होणार आहे. यापूर्वी ‘ब’ वर्ग नगरपरिषदांसाठी 40 हजार लोकसंख्येला 25 सदस्यांसह त्यापुढील प्रत्येक 10 हजार लोकसंख्येला एक सदस्य अशी अट होती, त्यात बदल करुन 10 हजारांऐवजी 40 हजारांपुढील प्रत्येकी पाच हजार लोकसंख्येला एका सदस्याची निवड करण्याबाबतची सुधारणा करण्यात आली आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार संगमनेर नगरपालिका हद्दीतील एकूण लोकसंख्या 65 हजार गृहीत धरण्यात आली आहे. सध्या संगमनेर नगरपरिषदेतील सदस्य संख्या 28 असून तीन नगरसेवक स्वीकृत आहेत. त्यात आता बदल होणार असून पालिकेची निवडून येणार्‍या सदस्यांची संख्या दोनने वाढून 28 वरुन 30 झाली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्यांना हायसे झाले आहे.

येत्या डिसेंबरमध्ये संगमनेर नगरपरिषदेच्या सदस्यांची मुदत संपणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार मुदत संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची निवड करावी लागते. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांचा कार्यक्रमच जाहीर होवू शकलेला नाही. त्यातच राज्य सरकारने पूर्वीच्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेऐवजी नव्याने द्विसदस्यीय प्रभाग रचना स्वीकारल्याने नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. मात्र त्याची प्रक्रियाही अद्याप सुरू नसल्याने संगमनेर नगरपालिकेची पंचवार्शिक निवडणूक पुढील वर्षी फेबु्रवारीतच पार पडण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Visits: 287 Today: 1 Total: 1582514

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *