संगमनेरातील मुस्लिमबहुल भागात ‘कडकडीत’ बंद! सर्व धर्मियांकडून ‘त्या’ कृत्याचा ‘संयुक्तपणे’ जाहीर निषेध..

नायक वृत्तसेवा संगमनेर

मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र धर्मगुरुंबाबत सोशल माध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरातील मुस्लिम धर्मियांनी कडकडीत बंद पाळला आहे. शहरातील सर्वच मुस्लिम बहुल भागातील दुकाने आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली आहेत. शनिवारी शांतता समितीच्या बैठकीदरम्यान एकत्रित झालेल्या हिंदू व मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा संयुक्तपणे जाहीर निषेध केला होता. यावेळी मुस्लिम समाजातील काही तरुणांनी सर्वधर्मियांकडून या घटनेचा निषेध म्हणून संगमनेर शहर बंद ठेवण्याची सूचना केली होती. मात्र त्यावर सर्व पक्षीयांचे एकमत होऊ न शकल्याने आजचा बंद केवळ मुस्लिम बहुल भागातच पाळला जात आहे. उर्वरित शहरातील व्यवहार मात्र सुरळीतपणे सुरु आहेत.

समाज माध्यमातील सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर शुक्रवारी बनावट नावाने खाते असलेल्या एका विकृताने मुस्लिम धर्माच्या पवित्र धर्मगुरुंच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर लिहून तो प्रसारित केला होता. या मजकुराला विविध ठिकाणच्या आणि आपली ओळख लपवून बनावट खाते असलेल्या तेहतीस जणांनी प्रोत्साहन दिले होते. सदरची बाब संगमनेरातील मोहम्मदिया मशिदीचे मुक्ती मौसिन सनमान खान यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी समाजातील श्रेष्ठींना याबाबत माहिती दिली. या प्रकाराने मुस्लिम समाजातील नागरिकांच्या भावना दुुखावल्याने संतप्त झालेला जमाव शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दिल्ली नाका परिसरातील तीन बत्ती चौकात जमा झाला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजीही झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या जमावाने दोषींवर तत्काळ कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला. पोलिसांनीही धार्मिक भावना दुखावल्यासक्ष तंत्रज्ञान कायद्यानुसार 34 जणांवर गुन्हे दाखल करून त्यातील तिघांना त्याच दिवशी पहाटे अटक केली. त्यामुळे जमाव शांत होऊन घरी परतला. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सदरच्या घटनेनंतर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीरामपूर उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे संगमनेरात दाखल झाल्या होत्या. या घटनेचे पडसाद तीव्र होऊ नयेत यासाठी त्यांनी शनिवारी दुपारी शांतता समितीची बैठक बोलावली. या बैठकीत हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील आजी-माजी नगरसेवकांसह ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिकांचाही समावेश असल्याने या बैठकीतून संगमनेरात शांततेचा संदेश गेला. या बैठकी दरम्यान याप्रकरणातील फिर्यादी असलेले मुफ्ती मौसिन शेख यांनी या प्रकरणात शहरातील कोणाचाही हात नाही. तसेच या घटनेचा सर्वच धर्माच्या नागरिकांनी निषेध केलेला आहे. या प्रकारची प्रवृत्ती पुन्हा कार्यान्वित होऊ नये यासाठी सर्व धर्मियांनी घटनेचा निषेध म्हणून एक दिवसाचा कडकडीत बंद पाळावा अशी सूचना त्यांनी बैठकीत मांडली. मात्र ही बैठक प्रशासनाने बोलाविली असल्याने बैठकीत बंद सारख्या विषयांवर चर्चा करता येणार नाही असे सांगत अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे यांनी या विषयावरील चर्चा थांबविली.
यानंतर दोन्ही धर्माच्या काही ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर जात एकमेकांची सल्लामसलत केली. गेल्या दोन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात कोविड संक्रमणामुळे व्यापार क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. लॉकडाऊन, निर्बंध यासारख्या सततच्या गोष्टींमुळे आधीच बाजारपेठेचा कणा मोडला आहे. आताशी कुठे बाजारपेठ सावरत असताना आणि सध्या सणासुदीमुळे बाजारात गर्दी असताना बंदचे आवाहन करणे अतिरेक ठरेल, त्याऐवजी उद्या शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी काळ्या फित बांधून कामकाज करावे अशी सूचना समोर आली. मात्र बंद या विषयावर एकमत न झाल्याने मुस्लिम समाजातील तरुणांच्या आग्रहावरून मुस्लिमबहुल विभागात या घटनेचा निषेध म्हणून बंद पाळण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने घेतला होता. त्यानुसार आजचा बंद पाळला जात आहे. या बंद दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
जुन्या आणि नव्या शहराला जोडणारा मोमीनपुरा परिसर, बागवानपुरा, गवंडीपुरा मशिदीचा परिसर,  सय्यदबाबा चौक, लखमीपुरा, देवीगल्लीचा परिसर, जोर्वे नाक्याचा परिसर, नायकवाडपुरा, पुणेनाका, दिल्ली नाका, नगररोडचा परिसर, कुरणरोड, तेलीखुंटचा परिसर अशा बहुतेक भागात व्यवहार पूर्णतः बंद असल्याने परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. काही भागात रस्त्यावरच तरुणांचे क्रिकेटही सुरू असल्याचे दिसले, तर बहुतेक भागात तरुणांचे टोळके कट्ट्यावर-कट्ट्यावर बसून गप्पा मारीत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात दिसून आले. आज सकाळपासून शहराच्या एका भागात सुरू असलेल्या कडकडीत बंद दरम्यान कोणत्याही अप्रिय घटनेचे वृत्त आलेले नाही. शहरात शांतता कायम असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *