वाघापूर येथे अज्ञाताने सोयाबीनला लावलेल्या आगीत मोठे नुकसान शेतकर्यांत भीतीचे वातावरण; प्रशासनाकडून पंचनामा तर पोलिसांचा तपास सुरू

नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोना महामारीमुळे आधीच शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले असताना शेतकर्यांचे अज्ञातांकडून नुकसान करण्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील वाघापूर येथील शेतकर्याच्या सोयाबीनला अज्ञाताने आग लावल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकर्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वाघापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर लिंबाजी लांडे यांनी त्यांच्या तीन एकरातील शेतात सोयाबीन केली होती. नुकतीच तयार करुन ती 40 पोते रचून ठेवले होते. दरम्यान, सोमवारी (ता.23) रात्री बारा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या सोयाबीनला आग लावली. यामुळे सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी रात्री आगीचे लोट पाहून शेतकरी ज्ञानेश्वर लांडे व त्यांची पत्नी उठले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार पहायला मिळाला.

जवळ पाणी नसल्याने त्यांना उघड्या डोळ्याने हा संपूर्ण प्रकार पहावा लागला. दोघेही पती-पत्नी धाय मोकळून रडत होते. ‘आता खायचे काय नि जगायचे कसे’ असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. विकृत मनोवृत्तीचा हा प्रकार समाजाला व गरीब कुटुंबाला किती घातक ठरणार याची कल्पना न केलेलीच बरी आहे. एकीकडे शेतकरी जगला पाहिजे ही वलग्ना होत असताना समाजातील वाईट प्रवृत्ती अशा घटना घडवत आहेत. आधीच कोरोनाचे संकट, त्यात रोजगार नाही ज्ञानेश्वर व त्यांच्या पत्नीने तीन एकरात सोयाबीन लावली. नुकतीच त्यांनी तयार करुन चाळीस पोते भरून घरासमोरील मोकळ्या जागेत ठेवले असता सोमवारच्या काळरात्री अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ही आग लावल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी पंचनामा करून नोंद घेतली आहे. तर अकोले पोलिसांकडे गुन्ह्याची तक्रार देण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सध्या भाजीपाल्यासह इतर शेतमालाचे प्रचंड खालावले आहेत. त्यात कोरोना महामारीने शेतकर्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडलेले आहे. त्यात निसर्गाशी सामना करत मोठ्या कष्टाने पिकविलेला मालही विकृतांच्या नजरेत येऊन त्याचा डोळ्यादेखत विनाश होतानाचे दृश्य पाहण्याची दुर्देवी वेळ शेतकर्यांवर आली आहे. त्यामुळे समाजातील अशा विकृतांचा वेळीच बंदोबस्त करुन शेतकर्यांना धीर द्यावा, अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.

