दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या आवळल्या मुसक्या श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई; पाच जणांविरोधात गुन्हा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना संकटात गुन्हेगारीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. अशाच एका गुन्ह्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नांत असलेल्या तिघांच्या श्रीरामपूर शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास नेवासा रस्त्यावरील पुलाजवळील इंदिरानगर येथील खंडोबा मंदिरासमोर तिघेजण स्वतःचे अस्तित्व लपवून रस्ता लूट अगर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेले होते. या दरम्यान गस्त घालत असलेल्या पोलिसांना या तिघांवर संशय आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडे गुन्हा करण्यासाठी लागणारे लोखंडी पाईप, नायलॉन दोरी, मिरची पूड, एक धारदार चाकू, दोन लाकडी दांडे, 35 हजार रुपयांची एक निळ्या रंगाची मोटरसायकल (क्र. एमएच.17, सीसी.1067) तसेच एक विना क्रमांकाची लाल रंगाची मोटारसायकल असा एकूण 70 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुख्य हवालदार संजय काळे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन सूरज पंडित शिंपी (वय 21), सचिन अण्णासाहेब ढोबळे (वय 28), सुनील सीताराम पडघलमल (वय 20) या तिघांसह दोघा अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेले तिघेही राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप हे करत आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 115564

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *