खासगी सावकाराने घेतला राजापूरातील कामगाराचा बळी! विस हजारांच्या बदल्यात दिड लाखांची वसुली; जाचाला कंटाळून अखेर आत्महत्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात खासगी सावकारी प्रतिबंधक कायदा अस्तित्त्वात असतांनाही सावकारीचा पाश मात्र कायम आहे. त्याचा फटका सर्वसामान्य माणसांना बसत असून खासगी सावकारांकडून वाट्टेल त्या दराने कर्जवसुली सुरु आहे. असाच धक्कादायक प्रकार तालुक्यातील राजापूरमधून समोर आला असून तेथील अण्णासाहेब निवृत्ती नवले यांनी संगमनेरातील दोघा सावकारांकडून तीन वर्षांपूर्वी अवघे 20 हजारांचे कर्ज घेतले होते व त्याची परतफेड करतांना तब्बल दिड लाख रुपये जमा केले होते. याउपरांतही त्या दोघांकडून पैशांसाठी सारखा तगादा सुरु असल्याने अखेर त्यांच्या जाचाला कंटाळून नवले यांनी आज सकाळी आपल्या रहात्या घराच्या बाथरुममध्ये गळफास आत्महत्या केली. या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेरातील दोघा सावकारांविरोधात आत्महत्येेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरातील एका कापड दुकानात सेल्समन म्हणून काम करणार्या अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय 43, रा.राजापूर) यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी संगमनेरातील सुदाम दुधे (रा.नेहरु चौक) व बालकिसन (रा.देवाचा मळा) या दोघांकडून 20 हजार रुपये कर्ज घेतले होते. या पैशांची ते दर महिन्याला ठरल्याप्रमाणे परतफेडही करीत होते. मात्र गेल्या बुधवारपासून (ता.12) ते अस्वस्थ दिसू लागल्याने त्यांच्या पत्नीने काय झाले? कामावर का गेले नाही? अशी विचारणा केली असता ज्यांच्याकडून मी उसनवारीने पैसे घेतले ते लोकं मला त्रास देत आहेत, पैशांसाठी मला धमकी देत आहेत. माझ्या जीवितास धोका आहे असे सांगू लागले. त्या दिवशी दुपारनंतर ते घरातून गायब झाले व दुसर्या दिवशी (ता.13) सकाळी घरी आले. कोठे गेला होता असे विचारता सावकाराच्या भितीने शेतात लपल्याचे त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले.
फेडू आपण हळूहळू असा धीर देत त्यांच्या पत्नीने त्यांची समजूत काढली. त्यानंतर दोन-तीन दिवस ते कामावरही गेले, मात्र शनिवारपासून ते घरीच थांबले होते. रविवारी (ता.16) जेवणानंतर सगळे झोपी गेले. आज (ता.17) सकाळी पावणे सातच्या सुमारास त्यांची पत्नी पाणी भरीत असतांना त्यांनी खोलीतील पलंगावर डोकावून पाहीले असता त्यांना आपले पती तेथे नसल्याचे दिसले. म्हणून त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडून पाहीला असता त्यांच्या पतीने आड्याच्या लोखंडी अँगलला दोर बांधून फाशी घेतल्याचे दिसले. ते पाहून त्यांनी आरडा ओरड केली असता आसपासच्या नागरिकांसह त्यांचा भाऊ धावत आला.
यावेळी मयत नवले यांचे पार्थिव खाली उतरविले असता त्यांच्या खिशात एक छोटी डायरी मिळून आली, त्याच्या पहिल्याच पानावर ‘3 वर्ष व्याज, 10 टक्के, 20 हजार सावकाराच्या व्यापाने (मरण) 1,50,000 1) सुदाम दुधे (नेहरु चौक), 2) बालकिसन (देवाचा मळा) माझ्या मुलांना मिळाले पाहिजे 90 हजार’ असे लिहिलेले होते. त्याशिवाय घेतलेल्या पैशांच्या बदल्यात दिलेल्या पैशांचा हिशोब लिहिलेल्या काही चिठ्ठ्याही त्यांना सापडल्या. त्यानंतर त्यांच्या पत्नी आशा नवले यांनी शहर पोलिसांत येवून वरील दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सुदाम दुधे (रा.नेहरु चौक) व बालकिसन (रा.देवाचा मळा) या दोघांविरोधात भा.द.वी.कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ अटक केली आहे.
राज्यात खासगी सावकारी विरोधात कायदा आहे व त्याचा आधार घेवून आजवर असंख्य कारवायाही झालेल्या आहेत. मात्र त्यानंतरही खासगी सावकारीचे पाश मात्र अजूनही सामान्यांच्या गळ्याभोवती पडत असून अण्णासाहेब नवले यांच्या मृत्यूने ते सिद्ध झाले आहे. खासगी सावकारी पूर्णतः बेकायदा असून अशा पद्धतीने कोणी आर्थिक पिळवणूक करीत असल्यास त्याविरोधात आत्महत्या करण्याऐवजी पोलिसांकडे तक्रार करण्याची गरज आहे. या घटनेत नाहक एका गरीब कामगाराचा बळी गेला असून त्यांची पत्नी व दोन मुले उघडी पडली आहेत.