वेटरचा खून करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडला नगर शहरातील पुणे बसस्थानकातून पथकाने आवळल्या मुसक्या

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील साक्षी हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरुन वेटरची हत्या करुन पसार झालेला आरोपी बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असताना अहमदनगर शहरातील पुणे बसस्थानक येथे मुसक्या आवळण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

रविवारी (ता.19) मध्यरात्री नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी शिवारातील साक्षी हॉटेल येथे वेटरचे काम करणारा नामदेव दराडे (वय 30, रा.गोळेगाव, ता.शेवगाव) याने किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून याच हॉटेलमध्ये काम करणारा वेटर सोनू नारायण छत्री (वय 27, रा. जोडवाडी, ता.गेवराई, जि.बीड) याच्या डोक्यामध्ये लोखंडी पहारीने वार करून त्याची हत्या करुन पसार झाला होता. या घटनेबाबत साक्षी हॉटेलचे मालक प्रमोद बापूसाहेब म्हसे (रा.कोंढवड, ता.राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.1789/2021 भादंवि. कलम 302 प्रमाणे आरोपी दराडे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची व आरोपीची माहिती घेतली. आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.

त्यानुसार पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ. विश्वास बेरड, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, सुनील चव्हाण, दीपक शिंदे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रवींद्र डुंगासे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, विनोद मासाळकर, मच्छिंद्र बर्डे, विजय धनेधर, चालक चंद्रकांत कुसळकर हे पथक आरोपीचा शोध घेत होते. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचे मूळ गाव तसेच शेवगाव बसस्थानक, पाथर्डी बसस्थानक, अहमदनगर शहरातील सर्व बसस्थानके, रेल्वेस्टेशन परिसरामध्ये शोध घेतला. याचवेळी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना पसार आरोपी नामदेव दराडे हा अहमदनगर शहरातील पुणे बसस्थानक परिसरामध्ये फिरत असून तो बाहेरगावी कोठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यास राहुरी पोलीस ठाण्यात आणले. अधिक तपास पोलीस करत आहे.

Visits: 91 Today: 1 Total: 1120964

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *