अल्पवयीन मुलीशी विवाह; नेवासा पोलिसांत नऊ जणांविरुद्ध गुन्हा पतीसह सासू-सासरे, आई आणि बुवाबाजी करणार्या तिघांचा समावेश

नायक वृत्तसेवा, नेवासा
एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासरे, आई अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बुवाबाजी करणार्या तिघांचाही समावेश आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नेवासे तालुक्यातील एका गावामधील अल्पवयीन मुलीचा विवाह ठरविला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना समजावून त्यांच्याकडून लेखी घेतले होते. त्यानंतर मुलीला तिच्या पाहुण्यांच्या घरी ठेवण्यात आले. तेथे 24 मे रोजी एका तरुणासमवेत तिचा विवाह लावण्यात आला. तिला पतीच्या घरी बळजबरीने नांदायला पाठविले. पतीने बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. घरकाम येत नसल्याने सासू तिला मारहाण करते. अल्पवयीन मुलगी घरी जायचे म्हणत असल्याने तिला बुवाबाजी करणार्यांकडे नेण्यात आले. तिला बाधा झाली आहे, असे म्हणून हात पिरगळून तिला मारहाण केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड.रंजना गवांदे यांना ही माहिती मिळाली. त्यांनी पीडित मुलीची भेट घेऊन तिला मानसिक आधार दिला.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना या प्रकरणाची माहिती देणारे निवेदन दिले. त्यामुळे या प्रकरणाला गती आली. या मुलीने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी पती, सासू-सासरे, काका-मावशी, आई आणि बुवाबाजी करणारे अशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी शासन वारंवार आवाहन करत असतानाही ज्यांना किमान समज आलेली नाही, अशा निरागस अल्पवयीन मुलींचा विवाह होत आहे. यामुळे शासनाने अधिक कडक पावले उचलण्याची आणि प्रबोधन करण्याची गरज आहे.
