सलाबतपूरमध्ये तीन रोहित्रे जळाल्याने अर्धे गाव अंधारात महावितरणचे दुर्लक्ष; अधिकृत ग्राहकांपेक्षा चोरीचे वापरकर्ते जास्त
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सलाबतपूर येथे दोन आठवड्यांत तीन रोहित्रे नादुरुस्त झाल्याने अर्धे गाव अंधारात आहे. रोहित्रे नादुरुस्त का झाली? अतिरिक्त भार कसा येतो? हे पाहण्यास महावितरणचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सलाबतपूर गावठाणमधील नागरिकांना रोहित्र विजेच्या अतिरिक्त भाराने खराब होत असल्याने ऐन सणासुदीच्या काळात अंधाराचा सामना करावा लागत आहे. गणपती बसल्यानंतर तब्बल आठ दिवस अर्धा गाव अंधारात होते. तर गेल्या पंधरा दिवसांत तीन रोहित्रे जळाली आहेत. या रोहित्रावरील वीज जोडणीपेक्षा आकडे टाकून वीज वापरणारांची संख्या जास्त आहे. तसेच वीज चोरांकडून सर्रासपणे शेगडी-हिटरचा वापर होत असल्याने विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सततच्या वीज चोरीमुळे पूर्ण दाबाने कधीच वीज पुरवठा होत नाही. मात्र महावितरण अधिकारी वीज चोरांवर कधीच कारवाई करताना दिसत नाहीत. उलट अधिकृत वीजधारकांकडून पठाणी स्टाईलने वसुली केली जाते. वीजबील न भरणारांची वीज जोडणी तोडली जाते. त्यामुळे महावितरणकडून चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था झाली आहे. तीन रोहित्र जळूनही अधिकार्यांना या रोहित्राला जोडलेल्या विजेची चोरी नक्की कोठे होते हे पाहणेही जमले नाही.
पहिला रोहित्र खराब झाला त्यावेळी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे दुसर्या दिवशी गावठाणसाठी नवीन रोहित्र उपलब्ध झाला. मात्र तो बसवण्यापूर्वी तरी रोहित्र का खराब होतो हे पाहणे गरजेचे होते. मात्र तसे न करता रोहित्र बसवले आणि शेवटी व्हायचे तेच झाले. दोन दिवसांत पुन्हा रोहित्र बदलण्याची वेळ आली. तोही तीनच दिवसांत जळून गेला. आता गावाची मुख्य पेठच अंधारात आहे. आता तीन रोहित्रानंतर गावठाण भाग नक्की कधी प्रकाशमान होईल हे सांगणे कठिणच आहे. गावठाणातच वीज नसल्याने याचा व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. विजेवर चालणार्या व्यावसायिकांवर हातावर हात देऊन बसण्याची वेळ आली आहे. यामुळे व्यावसायिकांची आर्थिक चणचण वाढली आहे. महावितरण अधिकार्यांनी नवीन रोहित्र बसवण्यापूर्वी वीज चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अधिकृत जोडणीधारक ग्राहकांमधून होत आहे.