गणेश विसर्जनातील सेवेबद्दल संगमनेर प्रशासनाकडून संघटनांचा सन्मान
गणेश विसर्जनातील सेवेबद्दल संगमनेर प्रशासनाकडून संघटनांचा सन्मान
विश्व हिंदू परिषद बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एकविरा फाउंडेशन आणि एनएसयूआयचा सहभाग
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरतील विविध संघटनांमुळे यावर्षीच्या गणेश विसर्जन वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी झाली नाही. उत्तम नियोजन, सर्व प्रशासकीय विभाग व विविध संघटना यांच्या अतुलनीय कामगिरीनिमित्त महसूल प्रशासनाकडून सर्व संघटनांचा सन्मान व ऋणनिर्देश पत्र देवून नुकताच करण्यात आला आहे.
यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने प्रशांत बेल्हेकर, सचिन कानकाटे, विशाल वाकचौरे, गोपाल राठी, कुलदीप ठाकूर, रमेश शहरकर यांनी सत्कार स्वीकारला. यावेळी गोपाल राठी यांनी प्रशासन व सर्व संघटनांचा समन्वय चांगल्या प्रकारे झाल्याने जीवितहानी झाली नसल्याचे नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने विवेक कोथमिरे, अनिकेत चांगले व चंद्रशेखर आझाद मंडळाच्यावतीने ज्ञानेश्वर थोरात, योगराजसिंह परदेशी यांनी सत्कार स्वीकारला. यावेळी ज्ञानेश्वर थोरात यांनी शांतता बैठकीत दिलेल्या सूचनांचे प्रशासनाने व सर्वांनी पालन केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सांगत आभार मानले.
एकविरा फाउंडेशनच्यावतीने डॉ.जयश्री थोरात आणि त्यांच्या सहकारिणींनी सत्कार स्वीकारला यावेळी त्यांनी कोरोना महामारीत आम्ही डॉक्टर सर्वस्वी प्रयत्न करीत आहोत, आपणही ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे मनोगत व्यक्त केले. एनएसयूआयचे निखील पापडेजा, सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग उपस्थित होते. तसेच युवा महेश, रोटरी क्लब, राष्ट्र सेवा दल यांचाही सन्मान करण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत यांनी सर्वांचा सत्कार केला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपविभागीय अधिकारी डॉ.मंगरूळे यांनी कोरोना महामारीत सर्वांनी चांगले सहकार्य केले, पुढेही आपल्या सर्वांचे सहकार्य हे समाजाला दिशा देणारे असेल असे मनोगत व्यक्त केले. तहसीलदार निकम यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.