वृषाली कडलग यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील देशमुख मळा (धांदरफळ) शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली सुनील कडलग यांना जिल्हा परिषदेचा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
लोकसहभागातून शाळेचा सर्वांगीण विकास आणि गुणवत्तेमुळे देशमुख मळा (धांदरफळ) द्विशिक्षकी शाळेला वृषाली कडलग यांच्या पुढाकारातून आय. एस. ओ. मानांकन मिळालेले आहे. कला मंच, प्रवेशद्वार, कंपाऊंड, मुलांसाठी खेळणी आदी सुविधा येथे उपलब्ध आहेत. रोटरी, इनरव्हिल क्लब सारख्या सामाजिक संस्थांची मदत मिळवून कडलग यांनी रोटरी ई-लर्निंग डिजिटल क्लासरूम, रोटरी वाचनालय, रोटरी हॅन्ड वॉश स्टेशन हे प्रकल्प राबविले आहेत. त्याशिवाय गांडूळ खत प्रकल्प, औषधी वनस्पती, सोनू-मोनू बचत बँक प्रकल्प, शुद्धलेखन प्रकल्प, कोविडच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद मात्र शिक्षण चाल’ यासाठी रोटरी क्लबचे सहकार्य मिळवून विद्यार्थ्यांना रोटरी डिजिटल स्कूल टॅब मिळवून दिले आहेत. ऑनलाईन शिक्षणासोबतच ऑफलाईन शिक्षणासाठी कडलग यांनी मुलांना त्यांच्या घरी जाऊन मदत केली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
वृषाली कडलग या गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आहेत. या माध्यमातून त्यांनी शिक्षिकांसाठी नारीशक्ती पुरस्कार सुरू करून महिलांचा सन्मान वाढवला आहे. गुरुकुल नारीशक्ती पुरस्काराच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभर शिक्षिकेंचे मोठे जाळे उभे केले आहे.