ऐतिहासिक रथोत्सवात उत्कर्षा रुपवतेंचा जय हनुमान! महिलांची तोबा गर्दी; गेल्या साडेनऊ दशकांपासून महिलाच ओढतात ब्रह्मचार्याचा रथ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत सरळ लढत होणार अशी अपेक्षा असताना उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करीत उमेदवारी मिळवल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांवर असलेला गद्दारीचा डाग आणि त्यात भूमीपूत्र असलेल्या रुपवतेंची उमेदवारी यामुळे या निवडणुकीची रंगतही वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी जेथे दिसतील तेथे मतदारांना गाठण्याचा सपाटा लावला आहे. असाच अनुभव संगमनेरच्या ऐतिहासिक हनुमान विजयरथाच्या शोभायात्रेतही दिसून आला असून मानकरी महिलांच्या बरोबरीने वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनीही आज भल्या सकाळी संगमनेरात येवून जय हनुमानचा नारा देत ब्रह्मचारी असलेल्या महाबलिच्या रथाची चाके ओढली. यावेळी त्यांनी निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याची सादही मारुतीरायाला घातली.
ब्रिटीशांचा मनाई हुकूम पायदळी तुडवित 23 एप्रिल 1929 रोजी संगमनेरच्या झुंजार महिलांनी श्री हनुमान जयंतीचा पारंपरिक रथ ओढला. या ऐतिहासिक घटनेला आज 95 वर्षांचा काळ लोटला आहे, मात्र तेव्हापासून दरवर्षी या रथोत्सवाची सुरुवात महिलांकरवी रथाची चाके ओढून करण्याची परंपराही सुरु झाली. त्यानुसार आज पहाटे मोठे मारुती मंदिरात जन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर शासनाच्यावतीने पोलिसांनी वाजत-गाजत येवून या ऐतिहासिक रथावर भगवा ध्वज चढवला. सकाळी आठच्या सुमारास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते रथात विराजमान उत्सवमूर्तीची आरती करण्यात आली.
95 वर्षापूर्वी घडलेल्या ‘त्या’ ऐतिहासिक घटनेनंतर आजही मोठे मारुती मंदिरापासून निघणार्या या करुन चाके महिलांकरवी गतिमान केली जातात. त्यासाठी सकाळपासूनच चंद्रशेखर चौकात महिलांची मोठी गर्दी जाणवत होती. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती मतांची पर्वणीच असल्याचे मानून वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचीही या उत्सवात उपस्थिती नोंदविली गेली. रथात विराजमान विजयी मुद्रेतील महाबलिचे दर्शन घेताना त्यांनी विजयाचा आशीर्वादही मागितला आणि संगमनेरकर महिलांच्या बरोबरीने रथाच्या चाकाला बांधलेला दोर हाती घेत ‘पवनपूत्र, महाबलि हनुमान की जय’चा घोष करीत रथाची चाकेही गतिमान केली. उत्कर्षा रुपवते यांची ही ‘हनुमान डिप्लोमसी’ त्यांना निवडणुकीत यश देईल किंवा कसे हे 4 जूनला समजेल, मात्र या जगावेगळ्या उत्सवात सहभागी होवून मिळालेल्या आनंदाची आणि समाधानाची लकेर मात्र त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.
श्रीरामभक्त हनुमान अखंड ब्रह्मचारी म्हणून ओळखले जातात. साहजिकच त्यामुळे कोणत्याही मारुती मंदिरातील गाभार्यात थेट महिलांना प्रवेश वर्ज्य असतो. संगमनेरच्या रथोत्सवात 1929 पर्यंत हिच परंपरा जोपासली जात असतं. मात्र ‘त्या’ वर्षी ब्रिटीश मॅजिस्ट्रेट रावसाहेब तांबे यांनी जातीय तणावाचे कारण देत रथयात्रा काढण्यास मनाई केली. बंदी आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी चंद्रशेखर चौकात सुमारे पाचशेहून अधिक सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला. त्यामुळे त्यावर्षी रथयात्रा निघणार की परंपरा खंडीत होणार असा प्रश्न निर्माण झाला. अनिश्चिततेच्या सावटातच एका तरुणाने मारुतीयाची प्रतिमा रथात इेवण्याचा प्रयत्न केला, मात्र सावध असलेल्या ब्रिटीश अधिकार्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि प्रशासन आणि नागरीकांमध्ये शाब्दीक हमरीतुमरी सुरु झाली.
या गदारोळाचा फायदा घेत झुुंबराबाई शिंपी या झुंजार महिलेने चपळाईने हनुमानाची प्रतिमा रथात नेवून ठेवली. बंकाबाई परदेशी यांनी महाबलि हनुमान की.. असा घोष करताच पोलिसांच्या उपस्थितीने जागोजागी गर्दी करुन उभ्या असलेल्या शेकडों महिलांमध्ये जणू शक्तिचा संचारच झाला आणि क्षणात शेकडों महिलांनी रथाचे दोर हाती घेत ब्रिटीशांना काही समजण्याच्या आधीच विद्युत गतीने रथाला गती दिली. तेव्हापासून बालबह्मचारी असलेल्या महाबलि हनुमानरायाच्या रथाची चाके ओढण्याचा मान महिलांनाच दिला जातो. या निमित्ताने झुंबराबाई अवसक (शिंपी), बंकाबाई परदेशी यांच्यासह त्यावेळच्या शेकडों महिलांचे स्मरण म्हणून झुंबराबाईंची प्रतिमाही रथावर लावली जाते. या परंपरेत सहभागी होत वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आज आपल्या नावाची नोंद इतिहासात करवून घेतली. दुपारी एकच्या सुमारास शहराच्या प्रमुख मार्गावरुन निघालेला हा विजयरथ पुन्हा मंदिराच्या प्रांगणात पोहोचला.
संगमनेरच्या श्री हनुमान रथोत्सवाला मोठा पराक्रमी इतिहास आहे. महिला संघटीत झाल्या तर त्या काय करु शकतात याचे ऐतिहासिक उदाहरण असलेल्या या उत्सवात मला सहभागी होता आले. एरव्ही मारुतीरायाच्या प्रतिमेला स्पर्श करणं महिलांसाठी वर्ज्य मानलं जातं असलं तरीही या रथोत्सवात मात्र 95 वर्षांपासून महिलांना रथ ओढण्याचा पहिला मान मिळतो. हा सोहळा डोळ्याने पाहणं आणि त्यात सहभागी होवून आपणही रथाची चाकं ओढणं हा अनुभव माझ्यासाठी खूप रोमांचित होता.
उत्कर्षा रुपवते
वंचित आघाडीच्या उमेदवार