राहाता शहरातील रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची मागणी भूमिगत गटारींच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांमुळेही होतोय त्रास

नायक वृत्तसेवा, राहाता
शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे या रस्त्यावरून जाण्या-येण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. नगरपरिषदेचे प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांनी शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण तत्काळ काढून रस्त्यांचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

राहाता शहरात कोपरगाव नाका ते हुतात्मा चौक शनि मंदिर परिसर, गवती मार्ग व इतर मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. तसेच रस्त्याच्या लगतच घराचे ओटे, पत्र्याची पडवी, घरासमोरील पायर्‍या व जिने, पाण्याच्या टाक्या, पाणी तापवण्यासाठी ठेवलेली चूल, बेशिस्तपणे रस्त्यावर रात्रीच्या वेळी उभी केलेली चारचाकी वाहने, रस्त्यालगत बांधलेली जनावरे, बांधकामासाठी आणलेली वाळू, खडी, विटा अशी विविध प्रकारची अतिक्रमणे रस्त्यावर केल्याने चारचाकी तसेच दुचाकीवाहनांना या अतिक्रमणामुळे मोठी कसरत करून मार्ग काढावा लागतो. अतिक्रमण करणार्‍यांना अनेकदा रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांनी समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नसून अनेकदा समज देणार्‍या नागरिक व अतिक्रमणधारक यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होण्याच्या घटना झाल्या आहेत. नगरपरिषदेत तक्रार करूनही प्रशासनाने रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍या नागरिकांवर कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे अतिक्रमण करणार्‍या नागरिकांचा मनोदय अजून वाढत चालला आहे.

कोपरगाव नाका ते हुतात्मा चौक हा रस्ता बाह्यवळण रस्ता म्हणून समजला जातो. शहरात यात्रौत्सव गणेश विसर्जन, चौकात रास्ता रोको किंवा इतर गर्दीमुळे नगर-मनमाड रस्ता वाहतुकीमुळे ठप्प झाला तर पर्यायी मार्ग म्हणून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी कोपरगाव नाका ते ग्रामीण रुग्णालय हा मुख्य बाह्यवळण रस्ता करण्यात आला. परंतु शहरात 24 लाख रुपये खर्चाची भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असल्याने या मुख्य बाह्यवळण रस्त्याची एक बाजू पूर्णतः बंद आहे. तसेच राहाता शहरातील सर्वच रस्त्याच्या मध्यभागी भूमिगत गटारीसाठी खोदलेल्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली. बाह्यवळण रस्त्याच्या एक बाजूस भूमिगत गटारीची गोदाई करून रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली. परिणामी अनेक वर्षांपासून हा रस्ता एकतर्फी सुरू आहे. या रस्त्याच्या मध्यभागी पथदिवे आहे. परंतु अनेक पथदिवे वाहनांच्या धडकेमुळे वाकलेले व जमीनदोस्त झाले आहे. तशीच परिस्थिती शहरातील गळवंती मार्गाची झाली आहे. शहरात वीरभद्र व नवनाथ महाराज यात्रानिमित्त शहराच्या मुख्य मार्गावरून गळवंती रथाची मिरवणूक जाते. त्या रस्त्यावर अनेक नागरिकांनी ओटे, पाण्याची टाकी, चूल, बेशिस्तपणे चारचाकी वाहने उभी करणे रस्त्यावर खडी, वाळू विटा ठेवणे अशा प्रकारचे अतिक्रमण केले आहे. तीच परिस्थिती शहरातील इतर रस्त्यांची झाल्याने चारचाकी वाहनधारकांना वाहने नेण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.
सर्वच रस्त्यांच्या मध्यभागी भूमिगत गटार खोदायचे काम झाल्याने सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहे. परिणामी शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ सर्वच रस्त्यांची शासकीय मोजणी करून रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढून शहराचा श्वास मोकळा करावा. तसेच भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेले रस्त्यांचे डांबरीकरण करून नागरिकांसाठी रस्ता अद्ययावत करून द्यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांच्यावतीने केली जात आहे. नगरपरिषदेचे प्रशासक म्हणून चंद्रकांत चव्हाण यांनी शहरातील प्रत्येक रस्त्याची पाहणी करून रस्त्यावरील असणारे अतिक्रमण काढून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी चर्चा शहरातील ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 115007

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *