श्रीरामपूरात घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना अटक शहर पोलिसांची कारवाई; 65 हजारांचा मुद्देमालही जप्त

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील प्रभाग दोनमध्ये घराच्या खिडकीच्या आतील कडी-कोयंडा तोडून 1 लाख 68 हजारांचा ऐवज चोरुन नेणार्‍या दोघा सराईत आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

श्रीरामपूर शहरातील प्रभाग दोनमधील रोशनी जावेद कच्छी यांच्या घराच्या खिडकीचे आतील कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करून 1 लाख 68 हजार रुपये रोख, मोबाईल व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुरनं. 571/2021 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सराईत आरोपी शहबाज सलीम शहा (वर 24, रा.काझीबाबा चौक) व नवाज उर्फ बिड्या राजमोहम्मद शेख (वर 31, रा.सिंधी कॉलनी) यांनी ही चोरी केली आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घारवट, पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख, पोलीस नाईक गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, आंधळे, राहुल नरवडे, किशोर जाधव यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 65 हजार 200 रुपये रोखसह इतर मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅटो रिक्षा (क्र. एमएच. 12, एजे. 5814) ही देखील जप्त केली आहे. यातील आरोपी शहबाज शहा याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घारवट हे करत आहेत.

Visits: 101 Today: 3 Total: 1110804

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *