मुख्यमंत्रीपदाचा निर्णय महाविकास आघाडीच घेईल! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची स्पष्टोक्ती; भूखंडावरुन नाव न घेता विखेंनाही टोला..
श्याम तिवारी, संगमनेर
पक्ष म्हणून राज्यभर केलेल्या दौर्यात सर्वसामान्य माणूस, तरुण, शेतकरी यांना काँग्रेसकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. पक्ष सोडून गेलेल्यांसह संपूर्ण राज्यात माणसं काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी इच्छुक असून आमच्या बाजूने जनाधार वाढत आहे. राज्यातील आजची परिस्थिती पाहता सत्ता परिवर्तन अटळ असून बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असे चित्र दिसत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय महाविकास आघाडी एकत्रित बसूनच घेईल असे स्पष्ट प्रतिपादन माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे केले.
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला रवाना होण्यापूर्वी स.म.थोरात कारखान्यावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारची काम करण्याची पद्धत पाहून जनतेची घोर निराशा झाली असून राज्यातील माणसं आता महाविकास आघाडीकडे आशाळभूत नजरेने पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता बदलानंतर भितीपोटी ज्यांनी पक्ष सोडले त्यांच्या पदरीही निराशाच आली असून आज ते देखील पुन्हा स्वगृही परतण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची पृष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
ज्येष्ठनेते, माजीमंत्री मधुकर पिचड व त्यांचे पूत्र वैभव यांनी आज मुंबईत ज्येष्ठनेते शरद पवार यांची भेट घेतली, त्यांच्या स्वगृही परतण्याच्या प्रश्नावर बोलताना थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीतील जागा वाटपात अद्याप अकोल्याच्या जागेचा निर्णय झालेला नाही. तेथील स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही ती जागा मिळावी अशी मागणी पक्षश्रेष्ठी म्हणून आपल्याकडे केली आहे. जागा वाटप झाल्यानंतर आघाडीतील ज्या पक्षाकडे अकोले मतदार संघ जाईल तो पक्ष त्यांच्याबाबत निर्णय घेईल असे सांगत त्यांनी पवार-पिचड भेटीवर अधिक भाष्य करण्याचे टाळले.
आपल्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत असताना गेल्या पाच वर्षांपासून मतदार संघात काम करणार्या त्यांच्या सुकन्या डॉ.जयश्री यांना कधी संधी मिळणार या प्रश्नाचे त्यांनी ‘योग्यवेळी योग्य निर्णय होईल’ अशा एकावाक्यातच उत्तर दिले. डॉ.जयश्री मतदार संघात फिरत आहे, लोकांना भेटत आहे. त्यांना कामाची आवड असल्याने त्या काम करीत आहेत. शेवटी ज्याने त्याने स्वतःच्या बळावरच राजकारणात आलं पाहिजे. त्यासाठी आधी जनतेने आपल्याला स्वीकारले पाहिजे, नंतरच राजकारणात प्रवेश केला पाहिजे असं आपलं स्पष्टमत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शैक्षणिक संस्थेला पाच हेक्टरचा भूखंड कवडीमोल भावात देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना थोरातांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. या प्रकरणात सरकारने नियमांची अंमलबजावणी केली की नाही, कागदपत्रांची पूर्तता झाली की नाही याची आपल्याकडे माहिती नाही. मात्र गेल्या तीन महिन्यात महायुती सरकारचा कारभार ज्या पद्धतीने सुरु आहे, विशेषत: शासकीय जमिनी व भूखंडाच्या बाबतीत ते बघता सरकार मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचारात गुंतल्याचे दिसत असून कवडीमोल भावात मोक्याच्या जमिनी व भूखंड धनदांडग्यांच्या घशात घातले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
बावनकुळेंचा विषय आपल्याला ज्ञात नाही, परंतु राज्यात जे चाललं आहे, ते सर्वत्र प्रसिद्ध होताना दिसत असल्याची कोपरखळीही त्यांनी दिली. सर्व गोष्टी अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरु असून त्या थांबल्या पाहिजेत. हजारों कोटी रुपयांच्या जमिनी कवडीमोल भावात दिल्या जात आहेत. आर्थिक हितासाठी जमिनींची विल्हेवाट लावली जात असून वनसंवर्धनासह आता दुग्ध विभागाच्या सी-लिंकजवळील मोक्याच्या जागेचीही विल्हेवाट लावण्याचा घाट सुरु असल्याचा गंभीर आरोप करतांना माजी महसूलमंत्र्यांनी विद्यमान महसूल व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता त्यांना जोरदार टोला हाणला.
दूग्ध विभागाची वरळीतील जागा गिळण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु असून कुर्ला, पुण्यातील 13 ते 14 व अगदी चाळीसगांवमधील जागांच्या बाबतीतही असेच प्रकार सुरु आहेत. त्यातून प्रचंड पैसा काढण्याचे काम केले जात असल्याचा थेट आरोप करताना त्यांनी यासर्व गोष्टी आम्ही थांबवणारच आहोत, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर यासर्व प्रकरणांची सखोल चौकशी केली जाईल असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्याबाबतही माजीमंत्री थोरात यांनी भाष्य केले. अमित शाह भाजपचे ज्येष्ठनेते आहेत. पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण त्यांच्या आढाव्यातून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार प्रचंड बहुमताने येणार असल्याच्याच निष्कर्ष समोर येईल अशी जोरदार कोपरखळीही त्यांनी दिली.
भाजपकडून एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. भाजपचे उद्दिष्ट खूप वेगळे आहे. त्यांनी कधीही लोकशाही व राज्य घटना मान्य केली नाही. भाजप केवळ त्यांच्या या उद्दिष्टांसाठी काम करीत असून आम्ही राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असल्याची टीकाही त्यांनी शेवटी बोलताना केली.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर आपलीच निवड होईल या चर्चेवर पत्रकारांशी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याचा निर्णय महाविकास आघाडीवर सोडून राज्य सरकारच्या कारभारावर मनसोक्त तोंडसुख घेतले. सरकारकडून अतिशय मोक्याच्या ठिकाणच्या हजारों कोटी रुपयांच्या जमिनी आणि भूखंड कवडीमोल भावात धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा उद्योग सुरु असल्याचा व त्यातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी मुंबईसह पुणे, चाळीसगांव येथील भूखंडाचे विषय छेडताना त्यांनी नाव न घेता दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विभागावरही तोफ डागली आहे. त्यासाठी त्यांनी वरळी सी-लिंकजवळील भूखंडाचा दाखलाही दिला असून त्याबाबत झालेल्या बैठकांवरही भाष्य केल्याने आगामी काळात याच विषयावरुन राज्यात थोरात विरुद्ध विखे असा नवा संघर्ष पेटण्याचेही संकेत मिळाले आहेत.