फरार अट्टल दरोडेखोरास सोनई पोलिसांनी ठोकल्या बेड्या जिल्ह्याबाहेरील पोलीस ठाण्यांतही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

नायक वृत्तसेवा, नेवासा
गेल्या 10 वर्षांपासून दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेला अट्टल दरोडेखोर रामहारी जाफर काळे (वय 28, रा.पासवाडी, ता.नेवासा) यास गुरुवारी (ता.3) रात्री दहा वाजेच्या सुमारास सोनई पोलिसांनी शिताफीने पकडून गजाआड केले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोनई पोलीस ठाणे व जिल्ह्याबाहेरील इतर पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, ड्रॉप, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या 10 वर्षांपासून रामहरी जाफर काळे (वय 28, रा.पासवाडी, ता.नेवासा) हा फरार होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत असताना तो त्याच्या राहत्या घरामागील डाळिंबाच्या बागेत दडून बसला असल्याची खात्रीशीर माहिती सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला.

वीजेरीच्या उजेडात पोलीस येत असल्याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा उठवत तो पुन्हा फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या विरुद्ध 2012 व 2013 मध्ये गंभीर स्वरुपाचा दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यास अटक करुन पोलिसांनी गुरनं. 87/2012 भादंवि कलम 395, 420, 411 आर्म अ‍ॅक्ट 4/25 गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.

सदर उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनईचे सहा. पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, संजय चव्हाण, पो.हे.कॉ.दत्ता गावडे, पो.ना.विशाल थोरात, आदिनाथ मुळे, बाबा वाघमोडे, पो.कॉ.विठ्ठल थोरात, अमोल जवरे, सचिन ठोंबरे, अमोल भांड यांनी केली आहे.

Visits: 104 Today: 1 Total: 1116163

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *