कोल्हार भगवतीपूरमध्ये एमआरएफ टायरचे शोमरूम फोडले तीन लाखांपेक्षा अधिक मुद्देमालाची चोरी; लोणी पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहाता
कोल्हार भागवतीपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून थंडावलेले चोरीसत्र पुन्हा सुरू झाले आहे. मंगळवारी (ता.13) मध्यरात्री चोरट्यांनी येथील सुरेश रामनाथ निबे यांचे एमआरएफ टायर शोरूमचे शटर तोडून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल चोरल्याची घटना घडली. सदर दुकानात सलग तिसर्‍या वेळेस चोरीची घटना घडली आहे.

मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी शोरूमच्या शटर खालील फरशी काढली. त्यानंतर शटर कटावणीच्या सहाय्याने उभे तोडले. चोरीपूर्वी येथील सीसीटीव्हीचे कनेक्शन आधी तोडून आपण कॅमेर्‍यात दिसणार नाही याची काळजी चोरट्यांनी घेतली. दुकानातील महागडे असलेले टायर टेम्पोत टाकून चोरटे पसार झाले. सदर घटनेची माहिती लोणी पोलिसांना अवघ्या काही वेळातच समजल्याने कोल्हार पोलीस आऊटपोस्टला नियुक्त असलेले सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे व पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र औटी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. मध्यरात्री दुकानाचे चालक सुरेश निबे यांना घरून पोलिसांनी दुकानात आणल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले.

या घटनेनंतर लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी तातडीने धाव घेतली. त्यानंतर नगरहून ठसे तज्ज्ञ व श्वान पथक यांना पाचारण करण्यात आले. सदर शोरूममध्ये सलग तिसर्‍यांदा चोरीची घटना घडली आहे. मागील कुठल्याही चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. मात्र सध्या नियुक्त असलेले लोणीचे सहा. पोलीस निरीक्षक पाटील व उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी यांनी अनेक गुन्ह्यांची उकल अल्पावधीत केली असल्याने या चोरीचा तपास होऊन चोरटे गजाआड होतील असा आशावाद दुकान चालक निबे यांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर चोरट्यांनी जणू कोल्हार भगवतीपूरकरांना इशाराच दिला आहे. आधीच कोरोना महामारीने आर्थिक चक्रात अडकलेल्या व्यापार्‍यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर लोणी पोलिसांनी वेगवेगळे पथके तयार करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला आला असून पुढील तपास उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी हे करत आहे.

Visits: 126 Today: 1 Total: 1109056

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *