राज्य सरकारने दिले ‘व्यापार स्वातंत्र्य’! स्वातंत्र्य दिनापासून जिल्ह्यातील व्यवहार रात्री दहा वाजेपर्यंत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य सरकारच्या ‘ब्रेक-द-चेन’ मोहीमेतंर्गत स्वातंत्र्य दिनापासून निर्बंधात असलेल्या बहुतेक सर्व व्यवसायांना ‘स्वातंत्र्य’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून त्यासंबंधीचे आदेशही अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आहेत. त्यानुसार येत्या स्वातंत्र्य दिनापासून जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल्स, उपहार गृहे व व्यायामशाळांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास सशर्त मुभा देण्यात आली आहे. चित्रपटगृह व धार्मिक स्थळांसह राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंधने मात्र कायम इेवण्यात आली असून लग्न सोहळ्यांसाठी उधित्तम उपस्थितीची मर्यादा आता दोनशे करण्यात आली आहे. या आदेशाने जिल्ह्याच्या व्यापारी वर्गासह हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.


राज्य शासनाच्या ब्रेक द चेन अंतर्गत स्वातंत्र्य दिनापासून राज्यातील निर्बंध शिथील करणार असल्याबाबत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अश्‍वस्थ केले होते. त्यानुसार ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्‍यांचे आदेश जारी होण्यस सुरुवात झाली असून अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनीही सायंकाळी पाच वाजता जिल्ह्यासाठीचा आदेश जारी केला असून 15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील कोणते व्यवसाय सुरु राहणार आहेत व कोणत्या क्षेत्राला मर्यादा असणार आहेत याबाबत स्पष्टता करणारे आदेश बजावले आहेत. या आदेशातून गेल्या दीर्घकाळापासून टाळेबंदीतून आर्थिक नुकसान सोसणार्‍या व्यापारी वर्गासह हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


येत्या 15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने व व्यवसाय सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. त्याचप्रमाणे शॉपिंग मॉल्स सुरु ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. उपहारगृहे व हॉटेल्ससाठीही पन्नास टक्के क्षमतेच्या अटीवर वेळेची मर्यादा रात्री दहापर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र ऑर्डर दिल्यानंतर खाद्यान्न येईपर्यंत ग्राहकांना मास्क आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे लागेल. त्यासोबतच उपहारगृह व अन्य व्यावसायिकांना वारंवार आपले दुकान अथवा हॉटेलचक निर्जतुंकीकरणही करावे लागेल. वातानुकलीत उपहारगुहांना खिडक्या व दारे उघडी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिअरबार व परमिट रुमसाठीही हाच नियम असणार आहे.


व्यायामशाळा, योग सेंटर, सलून व स्पा क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थितीत व वातानुकुलीत असल्यास वायुविजनासाठी दारे व खिडक्या धघड्या ठेवण्याच्या अटीवर रात्री दहापर्यंत सुरु राहतील. खासगी, सरकारी व निमसरकारी आस्थापनांतील कर्मचार्‍यांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या असतील व दुसरी मात्रा घेवून चौदा दिवसांचा कालावधी झाला असेल अशा सर्व कर्मचार्‍यांसह कोविड प्रतिबंधात्मक उपायांसह पूर्ण क्षमतेने सुरु ठेवता येतील. गर्दी टाळण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन व्हावे यासाठी या आस्थापनांना चोवीस तास सुरु ठेवता येईल.


विवाह सोहळ्यांसाठीही न्वयाने नियमावली जाहीर करण्यात आली असून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल. खुल्या प्रांगणात अथवा लॉन्समध्ये होणार्‍या सोहळ्यांना क्षमतेच्या 50 टक्के अथवा अधित्तम दोनशे आणि हॉल अथवा बंदीस्त ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्के किंवा अधित्तम शंभर जणांच्य उपस्थितीची पारवानगी देण्यात आली आहे. विवाह सोहळे होणार्‍या ठिकाणी प्रत्यक्ष निरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले असून कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रण अनिवार्य करण्यात आले आहे. त्याशिवाय लग्नकार्यात सेवा देणार्‍या प्रत्येक घटकाने लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणेही आवश्यक असणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास थेट परवाना ‘रद्द’ करण्याच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


जिल्ह्यातील सिनेमागृहे व धार्मिक स्थळे यापुढेही बंदच राहणार आहेत. आंतरराज्य प्रवास करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्यांना बाहेरच्या जिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआरची गरज असणार नाही. मात्र लसीकरण न झालेल्या प्रवाशांना 72 तासांतील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आवश्यक असेल, अन्यथा त्यांना चौदा दिवस विलगीकरणात रहावे लागेल. गर्दी, जमावाचे कार्यक्रम टाळण्यासाठी वाढदिवस, राजकी, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार, सभा, मेळावे, रॅल्या व मोर्चे यावर यापूर्वी प्रमाणेच निर्बंध कायम राहतील. ग्राहकांना सेवा देणार्‍या सर्व दुकाने, हॉटेल्स, उपहारगृहे, शॉपिंग मॉल्स व मंगल कार्यालयातील मालक, कर्मचारी यांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्र पूर्ण होवून किमान चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 30537

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *