विद्यार्थिनीच्या पालकाकडून लाच घेताना प्राचार्य व लिपिकास अटक श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील घटना; शैक्षणिक वर्तुळात खळबळ

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांनी आठ लाखांची लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीला पदवी प्रमाणपत्र आणि आंतरवासिता केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे दीड लाखांची लाच स्वीकारताना वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि लिपिकाला अटक करण्यात आली. वडाळा महादेव (ता. श्रीरामपूर) येथील शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडीकल कॉलेजमध्ये ही घटना घडली. प्रभारी प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे व लिपीक भारती बापूसाहेब इथापे यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरच्या एका विद्यार्थीनीच्या पालकांनी तक्रार दिली आहे. त्यावरून नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी (ता. 12) दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. गंगापूरच्या या विद्यार्थिनीने या वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसचे शिक्षण घेतले. तिचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, आंतरवासिता पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देणे, या कालावधीतील गैरहजेरीची तडजोड करणे यासाठी लाच मागण्यात आली होती. 1 लाख 47 हजार 500 रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांनी पंचासमक्ष जाऊन पडताळणी केली. तेव्हा प्राचार्य हरिश्चंद्रे यांच्या सांगण्यावरून लिपीक इथापे यांनी लाचेची मागणी केली. पडताळणी झाल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि आरोपींना पकडण्यात आले. प्रभारी प्रचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे (52 रा. मानूर, ता. राहुरी) व लिपीक भारती बापूसाहेब इथापे (वय 34, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) यांना पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक करांडे, संतोष शिंदे, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के, हारुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Visits: 126 Today: 2 Total: 1106591

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *