नियम धुडकावून ‘हॉटस्पॉट’ साकूरमध्ये अनेकांनी घेतले बिरोबाचे ‘दर्शन’! घारगाव पोलिसांचा हलगर्जीपणा; जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ओसरलेले संक्रमण माघारी बोलवणार्या पठारभागातील काहींचा हलगर्जीपणा प्रशासनातील काही घटकांच्या बेजबाबदारपणामूळे अद्यापही बिनबोभाटपणे सुरुच आहे. त्याचे मूर्तीमंत उदाहरण पठारभागाची राजधानी समजल्या जाणार्या आणि पंधरवड्यापूर्वीच ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या साकूरमधून समोर आले आहे. नागरीक आणि प्रशासनाच्या दुर्लक्षातून संक्रमणाची त्सुनामी भोगूनही पुन्हा तोच कित्ता गिरवतांना अनेकांनी आज यात्रा दिनानिमित्त ग्रामदैवत बिरोबाच्या मंदिर परिसरात गर्दी केली. या परिसरातील प्रसादासह अल्पोहाराची दुकानेही दिवसभर उघडी होती हे विशेष. इतके सगळे घडूनही घारगाव पोलीस या सगळ्या गोष्टींबाबत अनभिज्ञच राहील्याने त्यांचे लक्ष्य नेमके कोणीकडे अशी शंका निर्माण झाली आहे. बिरोबा यात्रेचा दिवस घारगाव पोलिसांना माहिती असू नये, किंवा माहिती असूनही त्यांनी खबरदारी म्हणून तेथे बंदोबस्त तैनात करु नये याबाबत आता पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह लागले आहेत.
प्रशासनातील सगळ्याच घटकांच्या दुर्लक्षातून पंधरवड्यापूर्वी पठारभागात कोविड संक्रमणाचा उद्रेक झाला. प्रादुर्भाव वाढीचा सर्वाधीक फटका साकूर गटातील वीस गावांना बसला. त्यातून या गटाला 31 जुलैपासून 8 ऑगस्टपर्यंत दहा दिवसांचा कडकडीत ‘लॉकडाउन’ पाळावा लागला. लॉकडाउनच्या कालावधीतही साकूरसह गटातून रुग्ण समोर येण्याची गती कायम होती, जी आजही कायमच आहे. आजच्या अहवालातून संगमनेर तालुक्यातून 161 रुग्ण समोर आले आहेत. त्यातील 30 टक्के रुग्ण पठारभागातील आहेत. यावरुन पठारभागात वाढलेले संक्रमण अजूनही पुर्णतः आटोक्यात आलेले नाही. लॉकडाउनचा कालावधी संपून जेमतेम पाच-सहा दिवस झाले आहेत. मात्र तरीही आम्ही केलेल्या चुकांतून कोणताही बोध घ्यायला तयार नसल्याचे चित्र संक्रमणातून अजूनही सावरत असलेल्या साकूरमध्ये आज दिसून आले.
साकूरचे ग्रामदैवत बिरोबा यांचा नागपंचमी आणि नारळी पोर्णिमा असा दोन दिवस उत्सव (यात्रा) केली जाते. यंदा मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर असा कोणताही उत्सव होणार नसल्याचे देवस्थानने यापूर्वीच जाहीर केले होते. उत्सवाच्या दिवशीही सामान्य भाविकांसाठी मंदिर बंद राहणार असल्याने दर्शनासाठी कोणीही येवू नये असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र तरीही आज सकाळपासून अनेक भाविकांनी देवस्थानच्या आवाहनासह कोविड नियमांना धुडकावून मंदिर परिसरात गर्दी केली होती. विशेष म्हणजे या परिसरात यात्रेनिमित्त प्रसादासह खेळण्या, सौंदर्य प्रसाधनांची दुकानेही लागली होती. मंदिर परिसरातील ग्रामपंचायतीच्या गाळ्यांमधील सर्व दुकाने सुरु होती व तेथे नागरिकांची मोठी रेलचेलही होती. दिवसभर या परिसरातील भाविकांची गर्दी तशीच टिकून होती.
यासोबतच साकूरमध्ये आज भाजी बाजारही भरला होता. बाजारातही नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. या गर्दीत प्रस्तुत प्रतिनिधीने घारगाव पोलिसांचा कर्मचारी शोधण्याचा अतोनात प्रयत्न केला, मात्र कानेकोपरे धुंडाळूनही त्यांचा शोध लागला नाही. साकूर म्हणजे मोठ्या लोकसंख्येची संपन्न बाजारपेठ. येथील प्रत्येक गोष्टीची घारगाव पोलिसांकडे नोंद असते. मग या नोंदीत साकूरचे ग्रामदैवत असलेल्या बिरोबाच्या उत्सवांबाबत माहिती नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. जर माहिती होती, तर मग घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील आपल्या कार्यक्षेत्रातील यात्रा-जत्रांसह गर्दीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यात अकार्यक्षम आहेत का? तसेही नसेल तर मग उत्सवाचा दिवस असूनही संक्रमणातून सावरत असलेल्या साकूरमध्ये पोलीस कर्मचार्यांची नियुक्ति का केली गेली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने घारगाव पोलिसांचा हा हलगर्जीपणा किती गांभिर्याने घेतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
काही नागरिकांचा हलगर्जीपणा आणि त्यात प्रशासनातील सर्वच विभागांचे दुर्लक्ष यातून संगमेर तालुक्यातून कोविड संक्रमण ओसरत असतांना त्याला पुन्हा जोर चढला. तालुक्याच्या पठारभागात संक्रमणाची गती अधिक होती. पंधरवड्यापूर्वी ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या व नंतर दहा दिवसांचा ‘लॉकडाउन’ पाळणार्या साकूरची अवस्था तर भयानक झाली होती. दररोज अबालवृद्धांना कोविडची लागण होत असल्याचे समोर येत होते. आत्ता कोठेतरी त्यात काहीशी सुधारणा होत असतांना पुन्हा त्याच घोडचुका होवू लागल्याने व त्यात प्रशासनातील घटकांचाही समावेश असल्याने तालुक्यातील कोविडचा मुक्काम दीर्घकाळ लांबण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर ज्या पद्धतीने कारवाई होते, तशीच कारवाई कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर होण्याची गरज आहे. अन्यथा ‘कागदोपत्री’ सबकूछ अलबेल असलेल्या तालुक्याच्या बुडाखालचा अंधार खांद्यावर यायला वेळ लागणार नाही.
अचानक वाढलेल्या संक्रमणाने चिंतीत झालेल्या जिल्हाधिकार्यांनी साकूरमध्ये धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यातून दहा दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यासह संक्रमण रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजनांवर विचार करुन अधिकारी व पदाधिकारी या दोहींच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आले. इतके सगळे होवूनही लॉकडाउनचा कालावधी संपताच पठारभागातील अतिसंक्रमित गावांमधून पुन्हा काही नागरिकांसह स्थानिक कर्मचारी व ग्रामपंचायत पदाधिकार्यांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसू लागला आहे.