सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाला केशकर्तनालयात बोलावून केला खून बीड जिल्ह्यात खून केल्यानंतर मृतदेह शेवगाव तालुक्यात आणून पुरला
नायक वृत्तसेवा, शेवगाव
लग्नानिमित्त सोने खरेदी करायचं आहे, असं सांगून सराफ व्यावसायिकाला केशकर्तनालयात बोलावून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. तसेच हत्येनंतर त्याचा मृतदेह शेतात पुरण्यात आला होता. बीड जिल्ह्यात खून केल्यानंतर मृतदेह अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आणून पुरण्यात आला. अखेर तीन दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीस आलं असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी फरार आहे.
लॉकडाऊन असला तरी अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने दुकाने उघडून व्यवहार केले जात आहेत. त्याचाच गैरफायदा आरोपींनी उठवला. सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाला सोने घेऊन बोलावून खून करण्यात आला. स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकांना निर्जन ठिकाणी बोलावून मारहाण करून लुटमारीच्या घटना यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र, सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाला बंद दुकानात बोलावून घेऊन लुटण्याची ही वेगळीच घटना अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर घडली आहे.
शिरुर कासार येथील सराफी व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे (वय 25) यांचा मृतदेह शेवगाव तालुक्यात आढळून आला होता. अधिक चौकशी केल्यानंतर या खून प्रकरणाला वाचा फुटली. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील ज्ञानेश्वर गायकवाड यांचे शिरुर कासार येथे सलूनचे दुकान आहे. त्याच दुकानात सोनराचा खून करण्यात आला.
भातकुडगाव येथील गट शेतकरी दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात मृतदेह पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचे शिरुर कासार येथे सलूनचे दुकान आहे. त्याने सोने खरेदीचा बहाणा करून विशाल सुभाष कुलथे यांना आपल्या दुकानात बोलावलं. लॉकडाऊनमध्ये आपले लग्न झाले असून जास्त सोने करायचे आहे, असे सांगून ऑर्डर देण्यात आली. दुकानातील तयार असलेले सोन्याचे दागिने घेऊन माझ्या दुकानात या, असे गायकवाड म्हणाला. कुलथे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सलून दुकानात सोने घेऊन गेले. तेथे गायकवाड याने साथीदारांच्या मदतीने त्यांचा खून केला आणि सोने घेऊन पोबारा केला. पोलिसांनी केतन लोमटे, शिवाजी गायकवाड यांना अटक केली आहे. मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड हा फरार आहे. शिरुर कासारचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.