डॉ. संजय मालपाणी हे महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक भूषण ः जाखडी डॉ. मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त पुरोहित प्रतिष्ठानचे वृक्षारोपण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘सतत समाजासाठी कार्यरत असणारे आणि लाखो युवकांचे आदर्श व प्रेरणास्थान असलेले शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय मालपाणी यांचे प्रचंड कार्य बघता ते महाराष्ट्राचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक भूषण आहे’, असे गौरवोद्गार पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी काढले.

डॉ. मालपाणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संगमनेरातील मालपाणी फाउंडेशनच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात बोलताना जाखडी यांनी वरील उद्गार काढले. यावेळी विशेष अतिथी म्हणून पत्रकार योगेश आसोपा, ध्रुवच्या प्राचार्या अर्चना घोरपडे, यशोवर्धन मालपाणी, पुरोहित प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप वैद्य, प्रतीक जोशी, विशाल जाखडी, नीलेश पुराणिक, बापू दाणी, ध्रुवचे सरव्यवस्थापक सचिन जोशी आदिंसह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला असून आज सत्तर फळझाडांचे रोपण करून त्याचा शुभारंभ करण्यात आला.

‘डॉक्टर मालपाणी यांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य आणि पर्यावरण विषयक कार्य हे अनमोल आहे. त्यांच्या व्याख्यानातून अनेकांना मोठी प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानातून अनेक युवकांना आपल्या जीवनाची दिशा मिळाली आहे. संगमनेरच्या या थोर सुपुत्राने अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. निसर्गप्रेमी असलेल्या डॉक्टर मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण हीच त्यांना सर्वोत्तम भेट असू शकते. त्यामुळे पुरोहित प्रतिष्ठानने वृक्षारोपणाचा संकल्प केला असल्याचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी नमूद केले. त्याला मालपाणी परिवाराची खंबीर साथ मिळालेली असल्याने लवकरच एक हजार वृक्षरोपणाचा संकल्प पूर्ण होईल आणि तो क्षण अतिशय कृतज्ञतेचा आणि आनंदाचा असेल असेही जाखडी म्हणाले.

यशोवर्धन मालपाणी आणि प्रमुख अतिथी आसोपा यांनीही छोटेखानी भाषणात डॉक्टर मालपाणी यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवले. सर्व फळझाडांचे रोपण ब्रह्मवृंद मंत्रघोषात धार्मिक पद्धतीने करण्यात आले. प्राचार्या घोरपडे यांनी पुरोहित प्रतिष्ठानच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले.
