घारगावात गावगुंडाची मागासवर्गीयाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण! चौघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; फोफावलेल्या अवैध धंद्यांचा परिणाम झाला गुंडगिरी वाढण्यात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘जसा राजा, तशी प्रजा’ या ऐतिहासिक संदर्भाचा अनुभव सध्या पठारभागातील सर्वसामान्य नागरिक घेत असून घारगाव पोलिसांच्या मेहरबानीने पठारभागातील सर्वच गावांमध्ये अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. त्याचा परिणाम हरामाचा पैसा खिशात घालून गोरगरीबांना दादागिरी आणि मारहाण करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. मंगळवारीही घारगावातून असाच प्रकार समोर आला असून ‘वाळूचे परमिट’ बंद केल्याचा राग मनात धरुन अवैध धंद्यातूनच जन्माला आलेल्या एका गावगुंडाने आपल्या तिघा साथीदारांसह एका मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. याप्रकरणी खंदरमाळ येथील निलेश सुपेकर या तरुणाच्या फिर्यादीवरुन अण्णा वाडगे या इसमासह अन्य तिघांवर भादंविच्या कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता.3) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास येठेवाडीत सदरचा प्रकार घडला. नांदूर खंदरमाळ येथील शांताराम धोंडीबा सुपेकर यांच्या नावावर मातीमीश्रित वाळूचे परमिट होते. 27 जुलै रोजी या परमिटची मुदत संपल्यानंतर त्यांनी त्याबाबत रीतसर अर्ज देवून आपल्या नावाने जारी करण्यात आलेले ‘मातीमीश्रित वाळूचे’ परमिट रद्द करण्याची विनंती केली होती व त्यानुसार सदरचे परमिट रद्दही झाले होते. मात्र त्यांच्या या कृतीने सुपेकर यांच्या मातीमीश्रितच्या परमिटवर डोळे लावून मनसुबे रचणार्या अण्णा वाडगे या इसमाचे पित्त खवळले. त्याने मंगळवारी (ता.3) शांताराम सुपेकर यांना फोन करुन परमिट का बंद केले? असा संबंध नसलेला सवाल करीत त्यांना अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ व दमदाटी केली.
यानंतर घटनेनंतर मंगळवारीच दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास डंपर चालक असलेला सुपेकर यांचा 36 वर्षीय मुलगा नीलेश हा आपल्या एका जोडीदारासह डंपरचा स्टार्टर दुरुस्त करण्यासाठी घारगावातील एका ऑटोमोबाईल्समध्ये आला. सदरचा स्टार्टर दुरुस्त करण्यास वेळ लागणार असल्याने त्यांनी त्या दुकानातून पर्यायी स्टार्टर घेतला व ते दोघेही आपल्या दुचाकीवरुन येठेवाडीकडे निघाले. यावेळी आपल्या ‘गँग’सह तेथे उपस्थित असलेल्या अण्णा वाडगे याने नीलेश सुपेकर याला पाहताच शिवीगाळ करीत त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या कृत्यात वाडगे याच्या तिघा साथीदारांनीही त्याला साथ दिली. नीलेश याने वारंवार ‘तुम्ही मला का मारत आहात’ अशी विचारणा केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन ते चौघेही त्याला लाथाबुक्क्यांनी मारीतच राहिले. अखेर नीलेशच्या जोडीदाराने मध्यस्थी करीत त्यांच्या तावडीतून त्याला सोडविली. यावेळी वाडगे याने ‘***** तुम्हांला जगायचे असेल तर नीट जगा, तुम्ही येठेवाडीत येवूनच दाखवा. तुझा बाप आम्हांला न सांगता परमिट बंद करतो काऽ’ असे म्हणत शांताराम सुपेकर यांच्यासह नीलेशलाही त्याने व त्याच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ केली.
वाद वाढायला नको म्हणून नीलेश सुपेकर याच्या जोडीदाराने त्याला दुचाकीवर बसवून नांदूर खंदरमाळ येथील त्याच्या घरी नेवून सोडले. घरी गेल्यानंतर त्याने घडला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगत आपला भाऊ श्रीकांत याच्यासह घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून घडला प्रकार कथन केला. या प्रकरणात मागासवर्गीय असलेल्या संबंधित तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण झाल्याने घारगाव पोलिसांनी प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव (शिर्डी) यांच्याशी संपर्क साधून त्यांना घडलेली घटना सांगितली. या प्रकरणातील तथ्य पडताळल्यानंतर त्यांच्याच आदेशाने घारगाव येथील अण्णा वाडगे व त्याच्या तिघा साथीदारांविरोधात भा.दं.वि. कलम 323, 504, 506, 34 व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या कलम 3(1)(आर)(एस), 3(2), (5 ए) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या वृत्ताने घारगाव परिसरात खळबळ उडाली असून वाडगे याच्या दादागिरीला वैतागलेल्या अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाळूतस्करीसाठी बदनाम असलेल्या मुळा पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय जोमाने फुलले आहेत. या सर्व व्यवसायांना घारगाव पोलिसांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याने पठारावर वाळूसह मटका, जुगार, गांजा असे सगळेच बेकायदा धंदे फोफावले असून तक्रारी होवूनही पोलीस त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने अवैध धंदेवाईकांचे व्यवस्थेने पोसलेले ‘वळू’ झाले आहेत. बेकायदा उद्योगातून पठारावरील वाडगेसारख्या अशा अनेकांच्या खिशात हरामाच्या पैशांची उष्णता वाढल्याने त्यातून आता गुंडगिरी निर्माण होवू लागली असून अशा व्यवसायातून निर्माण झालेले वळू सामान्यांच्या जीवावर उठत असल्याचे जिवंत उदाहरण या घटनेतून उभे राहिले आहे. पठारावरील सामाजिक स्वास्थ बिघडवणारे अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी आता वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनीच पठाराकडे लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे.