‘अखेर’ घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांचे पद रद्द! ग्रामसभेत पार पडली मतदान प्रक्रीया; लोकनियुक्त असलेले पद समाप्त होण्याची पहिलीच घटना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणार्या घुलेवाडीच्या लोकनियुक्त सरपंचाविरोधातील ठराव आज बहुमताने मंजूर झाला आहे. लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर गेल्या 5 जुलैला विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात उपस्थित सतरा सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने सोळा मते पडल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठविण्यात आल्यानंतर आज घुलेवाडीतील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात सरपंच राऊत यांच्या विरोधात 1 हजार 184 मते पडल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.

संगमनेर शहरालगतच असलेली घुलेवाडी ग्रामपंचायत महसुलाच्या बाबतीत तालुक्यात श्रीमंत समजली जाते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूहाचे बहुतेक प्रकल्प, तालुका दूध संघ, कामगार वसाहत, संगमनेर महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संस्था असलेल्या घुलेवाडीत संगमनेर शहरातील विस्तारीत वसाहतींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून तालुक्याच्या राजकारणात घुलेवाडीला अनन्य महत्त्व आहे. या ग्रामपंचायतवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे.

मागील मोठ्या कालावधीपासून घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्याविरोधात सदस्यांमध्ये खद्खद् सुरु होती. त्याचे पर्यवसान अविश्वास ठराव आणण्यात झाले. त्यानुसार 5 जुलैला अध्यासी अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली घुलेवाडी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेला सतरा सदस्यांसह सरपंच उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठरावाच्या नोटीसमध्ये नमूद मुद्द्यांवर सर्वांची मते जाणून घेण्यात आली. सरपंच सोपान राऊत यांनीही आपली बाजू मांडली. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी सोळा सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर अवघ्या दोघांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. ठरावाच्या बाजूने तीन चतुर्थांशपेक्षा अधिक मते असल्याने सदरचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता.

मात्र, सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आल्याने विशेष सभेचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठविण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार आज (ता.13) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार घुलेवाडीच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळी 9 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली. ग्रामसभेत ठरावाच्या बाजूने व विरोधात असे दोन्ही मतप्रवाह असल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी मतदान प्रक्रीया राबविली. त्यात अविश्वास ठरावाच्या बाजूने 1 हजार 184 तर ठरावाच्या विरोधात 1 हजार 15 मते पडली. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्यावरील अविश्वास ठराव 169 मतांनी मंजूर झाल्याने त्यांचे सरपंचपद संपुष्टात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महसूल असलेली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या घुलेवाडीच्या लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अलिकडच्या काळात लोकनियुक्त पदाधिकार्यावर अशा पद्धतीने अविश्वास ठराव मंजूर होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

