अनिश्‍चितता घेवून नववर्षाचा सूर्य उगवला! निवडणुकांचा धुराळा, व्यावसायीक वृद्धी की पुन्हा निर्बंध?


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाने गेल्या दोन वर्षांपासून टिकून असलेली अनिश्‍चितता कायम ठेवून नववर्षाचा सूर्य उगवला. मागील दोन वर्ष मानवी जीवासह उद्योग, व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. नववर्षात यापासून मुक्ती मिळेल, उद्योग-व्यवसायांची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येईल अशी आशा असतांना राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत भर पडू लागल्याने अनिश्‍चिततेचा फुगा पुन्हा एकदा फुगू लागला आहे. मागील दोन वर्षात कोविड संक्रमणातून लागू झालेला लॉकडाऊन, त्यातून लाखों जणांनी गमावलेला रोजगार, बाधित होवून उपचारापोटी खर्च झालेली आयुष्याची कमाई, मृत्यूमुखी पडलेले हजारों नागरिक आणि त्यातून निर्माण झालेली भयानक स्थिती मनात साठवून सामान्य माणूस नववर्षाच्या उगवत्या सूर्याकडे आशाळभूत नजरेने पाहत असला तरीही या गर्तेतून त्याची सुटका होण्यासारखी स्थिती आजतरी दूरदूरपर्यंत नजरेस पडत नसल्याचे चित्र आहे.


दोन वर्षांपूर्वी मार्च 2020 मध्ये देशात कोविड नावाची महामारी येवून धडकली. या शतकातील हा नवा संसर्ग असल्याने त्याला रोखण्यात संपूर्ण जग अपयशी ठरले. अगदी प्रगत समजल्या जाणार्‍या पाश्‍चात्य देशांनाही आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाऊनचा एकमेव पर्याय निवडावा लागला. सुरुवातीच्या काळात इटली, अमेरिका, ब्रिटनसारख्या बलाढ्य शक्ति आणि आरोग्य सुविधांसाठी पुढारलेल्या देशांमधील यंत्रणा कोलमडल्याने उपचारांशिवाय जीव सोडणार्‍या रुग्णांची माध्यमांद्वारे जगभर पसरलेली छायाचित्रे पाहून अवघे विश्‍व दहशतीखाली आले. त्यातून मनामनात भिती निर्माण झाल्याने सुरुवातीच्या काळात संक्रमण झाल्याचे समजताच भितीपोटी जीव सोडणार्‍यांची संख्या वाढू लागली. मात्र जसजसा काळ लोटत गेला, तसतसे भितीपोटी आपल्याच रुग्णांपासून दूर गेलेले डॉक्टर पुन्हा रुग्णसेवेत येवू लागले आणि संक्रमणासोबतच उपचारही उपलब्ध झाले.


कोविड संक्रमणाच्या पहिल्या लाटेत (मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021) देशभरातील लाखों नागरिकांना संक्रमण झाले, मात्र या कालावधीतील मृत्यूदर भितीदायक नसल्याने सामान्य माणूस कोविडसह जगण्याची सवय घालण्यात यशस्वी ठरला. या कालावधीत संक्रमणाची गती थोपवण्यासाठी लॉकडाऊन, कठोर निर्बध आणि निर्बंधासारखे वेगवेगळे प्रयोग राबवून सरकारने आपल्या नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कोविड उपचार केंद्रांच्या सुविधा निर्माण करण्यासह खासगी रुग्णालयांनाही त्यासाठी प्रेरीत केले. त्यामुळे अगदी सुरुवातीला विस्कटलेली आरोग्य यंत्रणा संक्रमणाच्या सहा-सात महिन्यांत रुग्णसंख्येसोबतच अधिक सक्रीय होत गेली. वर्षाच्या सुरुवातीला पसरु लागलेला संसर्ग वर्ष सरतासरता देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला, मात्र त्याचवेळी वषर्र्अखेरीस कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनसारख्या लशींची घोषणा झाल्याने घाबरलेली मनं पुन्हा स्थिरस्थावर होवू लागली.


गेल्यावर्षी जानेवारीत आरोग्य सेवकांच्या लसीकरणातून कोविडला पायबंद घालण्याचा प्रयत्न सुरु झाला. जानेवारी, फेब्रुवारीत दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट दिसून आली. त्यामुळे वर्षभर मास्क घालून वावरणार्‍यांना हायसे झाले, आपल्या शरीरात प्रतिपींडे तयार झाल्याचा समज करुन अनेकांच्या तोंडावरील मास्क हनुवटीवर आले, सततच्या निर्बंधांमुळे सामान्यांसह सरकारेही शिथील झाली. त्यातच गेल्यावर्षी जानेवारीत राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा धुराळा उडाला, त्यानंतर फेब्रुवारीपासून लग्नांचे बार उडू लागल्याने शेकडों, हजारों नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आयोजित होवू लागले. नागरिकांच्या गर्दीचे रोजचे विक्रम पाहून कोविड जणू मृतावस्थेत गेल्याचे चित्रही निर्माण झाले. त्याचा फटाका मार्चपासून बसायला सुरुवात झाली आणि एप्रिल व मे या दोन महिन्यात संक्रमणाने उच्चांक गाठला. या कालावधीत गावेच्या गावे बाधित झाली, असंख्य घरांमध्ये आप्तांच्या मृत्यूचे हुंदके कानी पडू लागले.


कोविडचे संकट टळले म्हणून बिनधास्त वावरणारे बाधित होवून मृत्यूमुखी पडले. या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात दोन लाखांहून अधिक तर जिल्ह्यात दहा हजारांवर नागरिकांचा बळी गेला. जूनपासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होवू लागल्याने माणसं कोविडच्या दुसर्‍या लाटेतून सावरु लागली. मागील सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्या उताराला लागली आणि वर्ष संपतासंपता त्यात लक्षणीय घट होवून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या दोन आकड्यांत तर तालुक्याची रुग्णसंख्या एकेरीत आली. त्यामुळे शासनाने तालुकास्तरावरील कोविड रुग्णालये बंदही केली. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षानेही इतिहासाची पुनरावृत्तीच करण्याचे ठरवून नववर्षाच्या उगवत्या सूर्यासह ओमिक्रॉनचे संकटही समोर आणल्याने नागरिक पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत. नववर्षात झालेले नुकसान भरुन निघेल अशी आशा बाळगणार्‍या व्यापारी वर्गाच्या चिंता पुन्हा वाढल्या, निर्बंधांची टांगती तलवार लटकत असल्याचे चित्र दिसू लागल्याने सर्वत्र भय आणि चिंता दिसू लागली आहे.


त्यातच नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्यांमधून कोविड नियमांची पायमल्ली झाल्याने आटोक्यात आलेले संक्रमण पुन्हा अनियंत्रीत होवू लागले आहे. राज्य मंत्रीमंडळातील तब्बल दहा मंत्र्यांसह 20 आमदार संक्रमणातून जायबंदी झाले आहेत. यासर्वांचा हजारों कार्यकर्त्यांसोबतचा वावर आजची कोविड स्थिती कोणत्या पायरीवर घेवून जाईल याबाबत साशंकता निर्माण करणारा आहे. मागील वर्षी ज्या गोष्टी घडल्या व त्यातून दुसरी लाट अनुभवायला आली तशीच स्थिती आत्ताही निर्माण झाली आहे. त्यामुळे नववर्षात सर्वकाही ठिक होईल, उद्योग-व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येतील अशी आशा बाळगणार्‍यांच्या अपेक्षा काळवंडू लागल्या आहेत. त्यातच आगामी काळात निवडणूकांचा धुराळा उडण्याचीही शक्यता असल्याने आपले राज्य, आपला जिल्हा कोविड संक्रमणाच्या तिसर्‍या लाटेसमोर उभा असल्याचे चित्रही दिसू लागले आहे.

Visits: 20 Today: 2 Total: 114886

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *