‘बांधलं कोणीही असेल, सोडलं तर आम्हीच ना!’ माजीमंत्री बाळासाहेब थोरातांचा जोरदार पलटवार; शिर्डीत काँग्रेसकडून प्रभावती घोगरे..
नायक वृत्तसेवा, शिर्डी
निळवंडे धरणाच्या कामात यांची कवडीचीही मदत झाली नाही, अडचणी मात्र खूप निर्माण केल्या. म्हाळादेवी की निळवंडे हा वादही यांनीच उपस्थित करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरोखरी म्हाळादेवीला आजचे धरण झाले असते तर राहाता तालुक्यातील वाकडीपर्यंत कधीच पाणी येवू शकले नसते. निळवंड्यासाठी निधी मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या पाटपाणी समितीच्या सदस्यांवर यांनी लाठीचार्ज केला, लोकांची हाडं मोडली. इतका कृतघ्नपणा महाराष्ट्राने आजवर कधीही पाहिला नसेल आणि आज तेच संगमनेरमध्ये येवून सांगताहेत की, बांधलं कोणीही असेल पण सोडलं तर आम्ही ना! अशा तिखट शब्दात चौफेर टीका करीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता आज शिर्डीत विखे पिता-पूत्रांचा समाचार घेतला.
गेल्या आठ दिवसांपासून माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील संगमनेर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या गटनिहाय युवा संकल्प मेळावे घेत आहेत. त्यातून ते थोरात यांच्यावर सातत्याने शाब्दीक हल्ला करीत आहेत. मात्र सध्या महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असताना संपूर्ण जबाबदारी थोरातांच्या खांद्यावर आल्याने त्यांचे मुंबई-दिल्ली दौरे सुरु आहेत. त्यामुळे डॉ.विखे-पाटील यांच्या टीकेला ते कसे उत्तर देतात याची उत्सुकता ताणलेली असतानाच आज शिर्डी मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हजेरी लावली. यावेळी शिर्डीतून लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे या काँग्रेसच्या उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत देतानाच त्यांनी डॉ.विखे यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरही सडकून टीका केली.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी दिवाळीत फटाके उडतीलच, पण आपण आजपासूनच दिवाळी सुरु करा असे सांगत राज्यात सत्ताबदल होणारच असल्याचा पुनरुच्चार केला. कोणत्याही स्थितीत राज्यातून महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवायचे आहे. त्यासोबतच शिर्डी मतदारसंघालाही गुलामी आणि दहशतीच्या राजकरणातून बाहेर काढायचे असल्याचे सांगत त्यांनी विखे-पाटलांच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेत गणेश कारखाना आणि लोकसभा निवडणुकीतून यांच्या दहशतीचे झाकणं उडालेच आहे, आता राहिलेले थोडेफार यावेळच्या निवडणुकीतून काढून टाकू असा सूचक इशाराही त्यांनी दिली.
डॉ.विखे-पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, तुम्ही संगमनेरात जावून आमच्या पारंपरिक विरोधकांना विचारा की संगमनेरात दहशतीचे वातावरण आहे का?, तुमच्या लोकप्रतिनिधींनी कोणाला जेलमध्ये घातलंय का?, फक्त विरोध केला म्हणून कोणाला त्रास दिलाय का? आणि हे देखील विचारा की, तुमच्या संस्था कशा चालतात?, इथला आर्थिक विकास कसा झालाय?, शैक्षणिक विकास कसा झालाय? हे मुद्दाम विचारा. मी ठामपणे सांगतो आमचे पारंपरिक विरोधकही संगमनेरचे राजकारण दहशत मुक्त असल्याचेच सांगतील असे सांगत त्यांनी डॉ.विखेंच्या ‘त्या’ वक्तव्याला कोपरा दिला.
राजकारणात बाकीचा गुंताडा करण्याची आमची पद्धत नसल्याने संगमनेरात जावून कोणी काहीही भाषणं केलीत तरीही त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. उलट तुम्ही जितकी भाषणं कराल तितका आमचा जनाधार वाढत जाईल अशी कोटी करीत त्यांनी त्या वक्तव्याची खिल्लीही उडवली. निवडणुकी बरोबरच डोक्यावर आपटल्यानंतर अशाच प्रकारची भाषणं होणार असे सांगत त्यांनी चांगल्या राजकारण व समाजकारणाचा वारसा लाभलेल्या कुटुंबातील प्रभावती घोगरे विधानसभा निवडणुकीत शिर्डीतून काँग्रेसच्या उमेदवार असतील असे स्पष्ट संकेतही यावेळी दिले.
राज्यात महायुती सरकारच्या विरोधात वातावरण असून ज्या पद्धतीने सरकार बनले, त्यांच्याकडून भ्रष्टाचार सुरु आहे हे लोकांना अजिबात मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. काय ते खोके? पहिल्या दिवशी खूद्द पंतप्रधान ज्याच्या विरोधात 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करतात दुसर्या दिवशी त्यांना पवित्र करुन त्यांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या जातात. काय तो भाजप आणि त्यांची तर्हा असे म्हणतं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवरही तोंडसुख घेतले.
महायुती सरकार जाती-धर्मात वाद लावत असल्याचा आरोप करीत त्यांनी महाराष्ट्र कधीही जातीवादी नसल्याचा उल्लेख केला. आज महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम करण्याचे प्रयत्न सुरु असून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुजरातच्या गुलामाप्रमाणे आदेशांची पूर्तता करीत ते म्हणतील तो उद्योग तिकडे पाठवित असल्याचा गंभीर आरोपही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला. हे भ्रष्ट सरकार आपल्याला घालवायचेच आहे, मात्र सोबतच शिर्डीत प्रभावती घोगरे यांनाही विधानसभेत पाठवायचे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या एमआयडीसीच्या वक्तव्याचा समाचार घेताना माजीमंत्री थोरात म्हणाले की, हे संगमनेरला येवून सांगतात आम्ही शिर्डीत एमआयडीसी करणार आहोत. मग 60 वर्ष तुमच्या घरात खासदारकी, आमदारकी, केंद्र व राज्य दोन्हीकडे मंत्रीपदं असताना ती का होवू शकली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खोटं बोलायचं, दहशत निर्माण करायची, दहशतीखाली माणसं ठेवून त्यांना गुलाम बनवायचं अशी यांची कार्यपद्धती आहे. राजकारणाच्या दोन पद्धती असतात. माणसांशी चांगला संवाद, वागणूक, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न, गरीब माणसाला अन्न, त्यांच्या मुलांना शिक्षण हा उद्देश ठेवून आम्ही राजकारण करतो.
मात्र यांचे असे आहे बँकेचे कर्ज घेवून त्याखाली माणूस दबला पाहिजे. म्हणजे तो आपोआप मतं देतो. अशी यांच्या राजकारणाची पद्धत असल्याचा घणाघाती टोलाही माजीमंत्री थोरात यांनी लगावला. डॉ.विखे-पाटील यांच्या संगमनेरातील भाषणांवर पुन्हा कटाक्ष टाकताना त्यांनी त्यांच्या दक्षिणेत खूप कामे केल्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना लोकांनी पहिल्याच टर्मनंतर घरी का बसवले असा खोचक सवाल त्यांना विचारला. गेल्या अनेक वर्षांपासून नगर-मनमाड रस्ता खड्ड्यात आहे. अनेकांचे कंबरडे मोडले, अनेकांचेही बळी गेले याला कोण जबाबदार आहे. तुम्हीच खासदार, तुम्हीच मंत्री तरीही रस्त्याचे काम का होत नव्हते, ठेकेदार का पळून जात होते, काय त्रास होत होता त्यांना असे अनेक सवाल विचारीत त्यांनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
शिर्डीत गोरगरीबांना उपचार मिळणारे चांगले रुग्णालय सुरु असताना तेथील डॉक्टरांवर खोट्या आरोपांन्वये कारवाया करुन ते बंद पाडले, आसपासच्या शेतकर्यांनी पिकवलेली फुले मंदिराच्या परिसरात विक्री व्हायची. गरीबांची मुलं ती विकून उदरनिर्वाह करायची. यांनी फुलविक्री बंद केली, उपासमार होवू लागल्याने त्या मुलांनी आंदोलन केलं तर यांनी लाठीचार्ज करुन त्यांचे हातपाय तोडल्याचा गंभीर आरोप करतानाच माजीमंत्री थोरात यांनी ‘यांची फुलांची अगरबत्ती’ मात्र सुरु असल्याची जोरदार कोपरखळीही हाणली. शिर्डीसह महाराष्ट्रातील शेती महामंडळाच्या जमीनी आपल्या महसूलमंत्रीपदाच्या कार्यकाळात खंडकर्यांना दिल्याचा दाखला देत त्यांनी 60 वर्षांपासून चाललेल्या लढ्यात यांनीच कोर्टातून स्थगिती मिळवून अडथळेही आणले आणि दुसरीकडे खंडकर्यांना झुलवत ठेवल्याचा घणाघाती टोलाही त्यांनी लगावला.
निळवंडे धरणाच्या कामाला निधी मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या कृती समितीच्या सदस्यांवर अमानुष लाठीचार्ज करुन त्यांची हाडं मोडली. इतका कृतघ्नपणा यापूर्वी राज्यात कोणीही केला नसेल तो यांनी केला अशा गंभीर शब्दात समाचार घेताना आता हेच सांगत आहेत की बांधलं कोणीही असेल, सोडलं तर आम्हीच ना! अशी कोटीही त्यांनी जोडली. यावेळी त्यांनी संगमनेरातील 15 वैद्यकिय महाविद्यालयांचा दाखला देताना त्यातील दहा पारंपरिक विरोधकांची असल्याचे सांगितले. त्यातील कोणालाही जावून विचारा तुम्हाला महाविद्यालयासाठी थोरातांची मदत झाली की नाही? मात्र इथे टपरी टाकणं तर सोडाच, स्वतःच्या जमिनीचा सातबारा काढण्यासाठी वाड्यावर जावे लागत असल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.