अस्तगावमध्ये बनावट लस देऊन फसवणूक
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील अस्तगाव येथील एका व्यक्तीने अडीशे रुपयांत लस देतो असे सांगून बनावट लस देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकार्यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे.
याबाबत तहसीलदार कुंदन हिरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अस्तगाव येथील एका व्यक्तीने 250 रुपयांत लस देतो असे सांगून नांदुर्खी येथील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना 1500 रुपये घेऊन लस दिली. लस देणार्या व्यक्तीचा आरोग्य विभागाची कुठलाही संबंध नाही. सदरचा प्रकार हा निंदनीय असून लोकांच्या आरोग्याशी व जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे. असा प्रकार जर सुरू असेल तर भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो. तरी सदर प्रकरणाची कायदेशीर चौकशी होऊन दोषींना कडक शासन करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. पंकज लोंढे, तालुका सरचिटणीस संजय जेजूरकर, शहराध्यक्ष नितीन सदाफळ, शहराध्यक्ष बबन नळे, उपाध्यक्ष समद शेख, काँग्रेस कार्याध्यक्ष गणेश चोळके, युवक तालुका सरचिटणीस प्रवीण घोडेकर, अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख, सरचिटणीस अमीन पटेल, दादासाहेब गवांदे, किरण गायकवाड, सतीश अत्रे, नामदेव जेजूरकर, अनिल पठारे, दिलीप नळे, सलीम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.