संगमनेरच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी कोणाची? प्रत्येक रस्त्यावरुन वाहते डोकेदुखी; बेशिस्तांच्या मनमर्जीला रोखणार कोण?..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐतिहासिक बाजारपेठेचे बिरुद मिरवणार्‍या संगमनेर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सामान्य नागरिकांसाठी त्रासदायक झाली आहे. दूरदृष्टीच्या अभावातून विस्तारलेल्या गावठाणाभोवतीच्या परिसरातील अरुंद रस्ते आणि त्यात अतिक्रमणांसह बेशिस्त वाहनधारकांची मनमर्जी, काही ठिकाणच्या त्रासदायक बेकायदा अड्ड्यांना ‘राजाश्रय’ अशा कारणांनी प्रगत शहराचा ढोेल बडवणार्‍या संगमनेरातील रस्त्यारस्त्यावरुन डोकेदुखी वाहत असल्याचे दिसून येते. यावर मात करुन नागरिकांना त्रासमुक्त करण्याची जबाबदारी असलेले पोलीस मात्र संख्याबळात आणि पालिका कचर्‍याच्या वर्गिकरणात अडकल्याने शहरवासियांना कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे. वास्तविक वाढत्या शहरातील दळणवळण सुरळीत रहावे यासाठी या दोन्ही घटकांनी एकत्रित उपाय शोधण्याची गरज आहे. मात्र वाहतूक ही व्यवस्था दोघांसाठीही गैरफायद्याची असल्याने त्याकडील दुर्लक्ष संगमनेरकरांचा मनस्ताप वाढवणारे ठरत आहे.


शहरातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला पर्याय निर्माण झाल्यानंतर शहरातंर्गत वाहतूक सुरुळीत होईल अशी आशा बाळगून असलेल्या पालिका आणि पोलीस प्रशासनाची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे या रस्त्यावरुन आजही अपेक्षेपेक्षा अधिक वाहतूक असते. कोल्हार-घोटी राज्यमार्गावरुन अकोल्याकडे जाणार्‍या वाहनांना बसस्थानकाच्या पल्याडचा एकमेव पर्याय असल्याने या मार्गावरील वाहतुकीची भर पडून दिल्लीनाका ते हॉटेल काश्मिरपर्यंतचा रस्ता नेहमीच वाहनांनी तुंबलेला असतो. शहराभोवती वाढलेल्या मानवी वस्त्या, ग्रामीणभागातून नियमित संगमनेरात येणारे नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थी यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची त्यात भर यामुळे संगमनेरची वाहतूक मोठी समस्या बनली आहे.


पूर्वी गावठाणापर्यंत मर्यादीत असलेल्या संगमनेरचा गेल्या चार-पाच दशकांत आसपासच्या परिसरात प्रचंड विस्तार झाला. मात्र शहर विस्तारतांना त्या-त्या वेळच्या सत्ताधार्‍यांनी भविष्याचा वेध घेण्याकडे दुर्लक्ष केल्याने उपनगरांना गावठाणाशी जोडणारे रस्तेही त्यावेळच्या गरजेप्रमाणे करण्यात आले. गावठाणातील जून्या इमारती पाडून नव्याने घरं, दुकानं उभी राहत असताना कोणताही विचार न करता बांधकाम परवानग्या दिल्या गेल्याने मनमानी पद्धतीने इमारती उभ्या राहील्या. त्यातून ग्राहकांची वर्दळ अपेक्षित असलेल्या व्यापार्‍यांनीही आपली दालनं थाटतांना ग्राहकांच्या वाहनांसाठी मात्र रस्त्याचाच विचार केल्याने समस्या गंभीर होत गेली. त्यातच अक्कलशून्य असलेल्या काही वाहनधारकांचीही भर पडत असल्याने मनात येईल तेथे भररस्त्यात वाहनं उभी करण्याची सवय जडली आणि सामान्य पादचारी, वयस्क, महिला व विद्यार्थ्यांची डोकेदुखीही वाढत गेली.


गेल्या दोन-तीन दशकांत व्यापाराचे केंद्र गावठाणातच राहून आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपनगरं उभी राहिल्याने शहराला जोडणार्‍या सर्वच छोट्या-मोठ्या रस्त्यावर दुचाकी-चारचाकी वाहनं आणि पादचार्‍यांची मोठी गर्दी असते. त्यात अरुंद रस्त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वाहनांची दाटी होत असताना अतिक्रमणधारक, दुकानांपुढे दुकाने लावणारे महाभाग, त्यापुढे त्यांच्या ग्राहकांची वाहने, त्यातून मार्ग काढीत असताना आडवे येणारे फळविक्रेते, भरीसभर म्हणून भररस्त्यात भंगारातील टाकावू आणि बेकायदा रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करणारे रिक्षाचालक आणि त्यांचे बेकायदा थांबे, त्यातील काहींना युवराजांनी दिलेला ‘राजाश्रय’ अशा वेगवेगळ्या कारणांनी शहरातील वाहतूक बेशिस्तीच्या वळणावर गेली आहे.


खरेतरं या समस्येतून मुक्त करण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांसह पालिकेचीही आहे. पोलिसांची वाहतूक शाखा रद्द झाल्याने दुष्काळात तेरावा या म्हणीप्रमाणे त्यांचे संख्याबळ घटले आहे. स्थानिक पातळीवरील गुन्हेगारी घटनांसह सध्या वाढलेला राजकीय संघर्ष यातच पोलिसांचा अधिक वेळ जात असल्याने त्यांच्याकडून वाहतूक नियमनासाठी अधिकच्या कर्मचार्‍यांची अपेक्षा अवास्तव ठरणारी आहे. मात्र त्याचवेळी पोलिसांनी नियमनाऐवजी सद्यस्थितीत यासाठी नियुक्त कर्मचार्‍यांकरवी बेशिस्तांना लक्ष्य करुन वाहतुकीची समस्या निर्माण करणार्‍यांवर सर्रास दंडात्मक कारवाई केल्यास काहीअंशी संगमनेरच्या बेशिस्त वाहतूक व्यवस्थेवर त्याचा चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. शहराच्या प्रमुख मार्गावर होणार्‍या वाहतूक कोंडीला अशीच वाहनं जबाबदार असल्याचे निरीक्षणही गेल्याकाही दिवसांत समोरही आले आहे.


पालिकेनेही कचर्‍याच्या वर्गिकरणातून बाहेर पडून अनेकभागातील अपूर्ण रस्त्यांची कामं उरकण्याची गरज आहे. शिवाय महसुलाच्या लालसेपोटी गावभर कोठेही बसण्याच्या तीस रुपयांच्या पावत्यांवरही मर्यादा आणून सामान्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. रस्त्यारस्त्यावर बोकाळत असलेली अतिक्रमणं, गर्दीच्या ठिकाणी बेकायदा रिक्षांसह निर्माण झालेले थांबे, वसुलीच्या नावाखाली रोज जन्माला येणारे फेरीवाले, फळवाले, भाजीवाले यांच्यावर नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी या दोन्ही विभागांनी आपापली जबाबदारी ओळखून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणं आवश्यक आहे.


संगमनेरच्या बाजारपेठेला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात जिल्ह्यात वेगात प्रगत होणार्‍या शहरांमध्ये संगमनेरचा उल्लेख होतो. हजारो वर्षांचा इतिहास बाळगणार्‍या संगमनेरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था मात्र शहराच्या नावाला बट्टा लावणारी असून या जटील समस्येतून सामान्य नागरिकाची सुटका होणं आवश्यक आहे. त्यासाठी पालिका आणि पोलीस या दोन्ही यंत्रणांनी समन्वयातून काम करण्याची आवश्यकता आहे. बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासह शहरातील रस्त्यारस्त्यावर होणार्‍या अतिक्रमणांवर नियमितपणे कारवाई झाल्यास या गंभीर समस्येतून संगमनेरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Visits: 373 Today: 2 Total: 1102837

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *