निळवंडे धरणाचा पाणीसाठाही झाला 50 टक्के! ओसरलेल्या पावसाला पुन्हा जोर चढण्याचा हवामान खात्याचा अंदाज

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या दहा दिवसांतच जिल्ह्यातील मोठ्या धरणांचा नूर पालटून चिंतेच्या जागी आनंद फुलविणार्या वरुणराजाचा मागील दोन दिवसांत जोर ओसरला आहे. मात्र सलग दहा दिवस कोसळलेल्या जलधारांनी मुळा, भंडारदरा व निळवंडे या धरणांचे पाणीसाठे समाधानकारक स्थितीत पोहोचवल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच पुढील चार दिवसांत पुन्हा पावसाला जोर चढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने जिल्ह्यातील मोठी धरणे ओसंडण्याच्या टप्प्यात आली आहेत. उत्तर नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेल्या भंडारदर्याचा पाणीसाठा समाधानकारक स्थितीत पोहोचल्यानंतर पातळी नियंत्रणासाठी आवक होत असलेल्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठाही आता पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे, त्यामुळे प्रवरेच्या लाभक्षेत्रात आंनद दाटला आहे.

दीर्घकाळ ओढ देणार्या पावसाचे गेल्या 19 जुलैला जिल्ह्याच्या तिनही मोठ्या धरणांच्या पाणलोटात दमदार पुनरागमन झाले. तेव्हापासून घाटघर, रतनवाडी, पांजरे, उडदावणे, सांम्रद, रतनगडाचा माथा, कळसूबाईची शिखररांग, वाकी, हरिश्चंद्रगड, पाचनई, कोथळे, पेठेचीवाडी, आंबित, लहीत, खडकी, कुमशेत, शिरपुंजे अशा सर्वदूर संततधार कोसळल्याने मुळा व प्रवरा खोर्यातील छोटे-मोठे प्रकल्प ओसंडून वाहू लागले. त्याचा परिणाम धरणांतील पाण्याची आवक वाढण्यात झाल्याने लांबलेल्या पावसाने निर्माण केलेल्या चिंता दूर सारल्या गेल्या आहेत. मागील दोन दिवसांत पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात मंदावला असून धरणांमध्ये होणारी नवीन पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. मात्र तरीही सद्यस्थितीत मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे.

वयाच्या शंभरीच्या दिशेने प्रवास करणारा आणि उत्तर नगर जिल्ह्याला वैभव प्राप्त करुन देणार्या भंडारदरा धरणात 83 टक्के पाणी आहे. धरणाच्या वेळापत्रकानुसार पुढील अंदाज गृहीत धरुण सध्या धरणाची पाणीपातळी 631.250 मीटरवर नियंत्रित केली जात असून धरणात दाखल होणार्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात 108 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले असून विद्युतगृहातून 830 तर मोरीद्वारे 427 असे एकूण 1 हजार 257 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदर्यातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात अडविले जात असल्याने आज सकाळी सहा वाजता निळवंडे धरणाचा पाणीसाठाही 49.57 टक्के झाला असून दुपारपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा पन्नास टक्क्यांच्या पुढे सरकणार आहे. निळवंड्याच्या पाणलोटातील 112.66 दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी लघु पाटबंधारे यापूर्वीच ओसंडला असून पाऊस कमी झाल्याने धरणाच्या भिंतीवरुन कोसळणारा प्रपातही मंदावला आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासांत निळवंडे धरणात अवघ्या 556 क्युसेक्स वेगाने 46 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. त्यात भंडारदर्याचे 108 दशलक्ष घनफूट पाणीही मिसळले आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या मुळा धरणातही आज सकाळी 61.15 टक्के पाणी जमा झाले असून त्यातील 53 टक्के पाणी उपयुक्त आहे. मागील चोवीस तासांत मुळा खोर्यातील पावसाचा जोरही पुर्णतः ओसरला असून हरिश्चंद्रगडाचा परिसर वगळता पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात आवेशाने वाहणार्या मुळानदीचे पात्र आटले असून सध्या मुळा धरणात 3 हजार 212 क्युसेक्स वेगाने पाणी जमा होत असून मागील चोवीस तासांत धरणात 227 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. पुढील चार दिवसांत कोकणासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाला पुन्हा जोर चढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील बळीराजच्या आशा उंचावल्या आहेत.

अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दहा दिवसांच्या झंझावातानंतर धरणांची स्थिती समाधानकारक करणार्या पावसाने उत्तरेकडील केळी, सांगवी व आढळा धरणांसह भोजापूरच्या पाणलोटात मात्र दुर्लक्ष केल्याने या जलाशयांच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातील बळीराजाचे डोळे आकाशाकडे खिळले आहेत. या धरणांच्या लाभक्षेत्राप्रमाणेच वरील तिनही मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्राची अवस्था आहे. मोठ्या धरणांच्या पाणलोटात मुसळधार सुरु असली तरीही लाभक्षेत्रातून मात्र पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठे समाधानकारक असतानाही बळीराजाच्या चेहर्यावर काही प्रमाणात चिंतेचे ढग गोळा झाले आहेत. पुढील काही दिवसांत ते दूर होतील अशी आशा आहे.

गेल्या चोवीस तासांत पाणलोटातील रतनवाडीत 37 मिलीमीटर, घाटघर येथे 30 मिलीमीटर, पांजरे येथे 27 मिलीमीटर, भंडारदरा 18 मिलीमीटर, वाकी 15 मिलीमीटर, निळवंडे व कोतूळ प्रत्येकी तीन मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी सहा वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा 15 हजार 899 दशलक्ष घनफूट (61.15 टक्के), भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 9 हजार 182 दशलक्ष घनफूट (83.18 टक्के), निळवंडे धरणाचा पाणीसाठा 4 हजार 128 दशलक्ष घनफूट (49.57 टक्के) व आढळा धरणाचा पाणीसाठा 512 दशलक्ष घनफूट (48.30 टक्के) झाला आहे.

