चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; दोघे बालंबाल बचावले वाकडी येथील घटना; परिसरातील नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील वाकडीच्या उपसरपंच जयश्री जाधव यांचे पती हे विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेले असता दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने यात कोणासही इजा झाली नाही. दोघे मात्र बालंबाल बचावले आहेत.

वाकडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच जयश्री जाधव यांचे पती सुरेश जाधव यांची वाकडीतीलच पिंगळवाडी शिवारात जमीन आहे. रविवारी (ता.1) साडेनऊच्या सुमारास सुरेश जाधव हे आपल्या चुलत भाऊ सोपान जाधव यांच्याबरोबर दुचाकीवर विद्युत मोटार बंद करावयास गेले असता मोटार बंद करुन घरी परतताना रस्त्यालगत सोयाबीनमध्ये दडी धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे दोघेही अगोदर घाबरले. परंतु बिबट्या लक्षात येताच यांनी दुचाकी भरधाव वेगाने काढत तिथून निसटून आले. बिबट्याची झेप चुकवल्यानंतर बिबट्याने मोठ्याने डरकाळी देखील फोडली.

यावेळी दुचाकीवरील दोघांनीही आपले दोन्ही पाय वर उचलल्यामुळे आणि बिबट्याची झेप चुकल्याने दैव बलवत्तर म्हणून कोणासही इजा झाली नाही. तत्पूर्वी वाकडीत बरडभागात बिबट्या दिसने हे नित्तनेमाचे झाले आहे. परंतु आत्तापर्यंत कोणावरही जीवघेणा हल्ला झाला नव्हता. बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर स्थानिक रहिवाशी हे काळजी घेत शेतात काम करत होते. परंतु यावेळी बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तरी वन विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणीही परिसरातील नागरिकांतून जोर धरु लागली आहे.

Visits: 214 Today: 1 Total: 2126014

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *