शिर्डी लोकसभा मतदार संघात राजकीय ‘ट्विस्ट’! बबन घोलप यांची ‘एन्ट्री’; महसूलमंत्री विखे पाटलांशी संगमनेरात अर्धातास गुप्तगू..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन 2014 साली काँग्रेसवासी झालेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेनेतील पुनर्रप्रवेशाने राजकीय गोंधळ उडालेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघात आणखी एक ‘ट्विस्ट’ आला आहे. उबाठा सेनेला रामराम करुन प्रतिक्षा यादीत ताटकळत असलेल्या माजीमंत्री बबन घोलप यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत हा ‘कार्यक्रम’ झाला असला तरीही त्याचे पडसाद मात्र शिर्डी लोकसभा मतदार संघात उमटले आहेत. घोलपांची पक्षात ‘एन्ट्री’ विद्यमान खासदार आणि घोषित उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी विद्यमान खासदारांसह राजकीय कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बबन घोलप यांची त्याच ठिकाणी ‘गुप्त’ बैठकही झाली. आश्‍चर्य म्हणजे जवळपास अर्धातास बंद दाराआड झालेल्या या खलबतांची भणकही लोखंडे यांना लागली नाही. दोघांत काय चर्चा झाली याबाबत मात्र कोणतीही माहिती उपलब्ध नाही.


संयुक्त शिवसेनेतील अंतर्गत पडझडीनंतर शिल्लक राहिलेल्या शिलेदारांना सोबत घेवून उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकराने खिंड लढवली. इतक्या मोठ्या धक्क्यानंतर मूळ शिवसेना सावरेल अशी अपेक्षा नसतानाही त्यांनी सुपूत्र आदित्यच्या साथीने अख्खा महाराष्ट्र फिरुन शिवसैनिकांमध्ये जोश भरला. साहजिकच 18 खासदारांमधील 13 खासदार शिंदेसेनेत गेले असले तरीही यासर्व जागांवर प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून उबाठा सेनाच असल्याने इच्छुकांनी पक्षफूटीनंतर लागलीच राजकीय जाळे विणायला सुरुवात केली होती. नाशिकच्या देवळालीतून पाचवेळा निवडून आलेले माजीमंत्री बबन घोलपही त्यातीलच एक. तब्बल साडेपाच दशके सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना बांधिल राहिलेल्या घोलप यांनी इतक्या मोठ्या धक्क्यातही मातोश्रीचा हात सोडला नाही.


त्या बदल्यात त्यांना उमेदवारीचा शब्द देवून शिर्डीच्या संपर्क प्रमुखपदीही पाठवण्यात आले. शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच घोलप पक्षासोबत असल्याने त्यांचा राज्यातील शिवसैनिकांमध्ये चांगला संपर्क आहे. त्यातही अहमदनगर जिल्हा अग्रणी आहे. त्यांनी यापूर्वीही जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून काम केले होते. त्यांच्या काळातच जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार होवून शाखांची संख्याही वाढली. जिल्ह्यातील जुन्या सैनिकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळेच ठाकरे यांनी त्यांना शिर्डीत धाडले होते. मात्र दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या बळावर संसदेत पोहोचलेल्या आणि त्यानंतरच्या निवडणुकीत ऐनवेळी पक्षाला जय महाराष्ट्र करुन काँग्रेसमध्ये गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी मातोश्रीवर जावून उबाठा सेनेत प्रवेश केला आणि लगेच उमेदवारीही पदरात पाडून घेतली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तो निर्णय बबन घोलप यांच्या मात्र जिव्हारी लागला आणि त्यांनी लागलीच शिर्डीच्या संपर्क प्रमुखपदासह पक्षाच्या उपनेतेपदाचाही राजीनामा दिला. अर्थात पक्षानेही सुनील शिंदे यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ति करीत एकीकडे त्यांच्या नाराजीकडे कानाडोळा केला, तर दुसरीकडे त्यांचा उपनेतेपदाचा राजीनामा मात्र फेटाळला. त्यानंतर महिनाभर ठाकरेंसोबत थांबून त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचा भाजप अथवा शिंदेसेनेत प्रवेश होवून ते शिर्डीची उमेदवारी करतील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत शिर्डीच्या विद्यमान खासदारांच्या नावाची घोषणा झाल्याने या सर्व चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम मिळाला.


यासर्व घडामोडीत विद्यमान खासदारांनी सर्व्हेतून समोर आलेल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्नही केला. गेल्याकाही दिवसांपासून त्यांनी शिर्डीतच तळ ठोकला असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती पहिल्यांदाच नजरेस भरत आहे. खरेतर बबन घोलप यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेवून शिर्डीच्या उमेदवारीवर दावा सांगितला होता. त्याचवेळी त्यांच्यावर न्यायप्रविष्ट असलेल्या दोन प्रकरणांवरही चर्चा झाली होती. काल-परवाच त्यातील एका प्रकरणाचा निकाल झाल्याची माहिती असून एव्हढ्यात दुसरेही प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे. यासर्व घडामोडी शिर्डी लोकसभा मतदार संघात अनिश्‍चितता निर्माण करणार्‍या ठरल्या आहेत.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपने राज्यातील सर्व 48 मतदार संघात सर्व्हे करुन मतदारांचा कौल जाणून घेतला होता. त्यात शिर्डी लोकसभेच्या विद्यमान खासदारांबाबत नकारात्मक अहवाल प्राप्त झाल्याने शिर्डीबाबतही पेच निर्माण झाला. मात्र पक्षफूटीनंतर साथ देणार्‍या खासदारांवर अन्याय होवू देणार नाही असा त्यांना शब्द दिल्याचे प्रमाण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची तिकिटं कापण्यास कडाडून विरोध केला. लोखंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना उमेदवारीचे साकडे घातल्याने त्यातून जनसंपर्क वाढवून नकारात्मक वातावरण सकारात्मक करुन दाखवण्याची अट घालून त्यांना मतदार संघात पाठवण्यात आले. त्यामुळे सध्या ते शिर्डीत तळ ठोकून बसले असून सार्वजनिक कार्यक्रमांना कधीनव्हे ती त्यांची उपस्थिती दिसू लागल्याच्याही जोरदार चर्चा रंगल्या आहेत.


त्यातच आता शिर्डीच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी असलेले माजीमंत्री बबन घोलप यांचा शिंदेसेनेतील प्रवेश विद्यमान खासदार आणि घोषित उमेदवार सदाशिव लोखंडे यांना अस्वस्थ करणारा असून शिर्डीची उमेदवारी बदलली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. लोखंडे यांच्यासाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे शुक्रवारी (ता.5) संगमनेरात बंदर व खणीकर्म मंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींच्या उपस्थितीत ‘महायुती मेळावा’ पार पडला. या कार्यक्रमाला खासदार सदाशिव लोखंडे यांचीही उपस्थिती होती हे विशेष.


मुख्य कार्यक्रम सुरु असतानाच माजीमंत्री बबन घोलप यांची कार्यक्रमस्थळी ‘एन्ट्री’ झाली आणि ते ठरल्या ठिकाणी जावून प्रतिक्षा करु लागले. काही वेळातच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्या ‘गुप्त’ ठिकाणी पोहोचले आणि दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास अर्धातास चर्चा झाली. त्यानंतर घोलप आपल्या वाहनातून निघून गेले व मंत्री विखे पाटीलही मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे कार्यक्रमस्थळावरच झालेल्या या अर्धातासाच्या खलबतांची साधी भणकही विद्यमान खासदार आणि उमेदवाराला लागली नाही. त्यामुळे शिर्डीच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या असून ‘विखे-घोलप’ भेटीने त्याला एकप्रकारे बळच मिळाले आहे. घोलप यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाचे फळ त्यांना मिळते कि त्यांच्या मुलाला हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाने विद्यमान खासदारांची चलबिचल वाढली आहे हे मात्र खरे.


राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार विद्यमान खासदारांना मतदारांमधील त्यांच्या विषयीचे मत सकारात्मक करण्यासाठी दिलेल्या वेळेचा परिणाम पडताळल्यानंतर उमेदवार बदलण्याचा निर्णय होवू शकतो. शिर्डीसाठी जुना दावा असलेले माजीमंत्री बबन घोलप यांचा अशावेळी शिंदेसेनेतील प्रवेशही खूप बोलका आहे. संगमनेरातील एका कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत त्यांची ‘गुप्तगू’ देखील राजकीय संकेत देणारी आहे. या शिवाय पुनःअहवाल सकारात्मक असल्यास घोलप यांना वेगळा शब्द देवून त्यांच्या शिर्डीतील संपर्काचा उपयोग केला जाण्याचीही शक्यता आहे. एकंदरीत येत्या काही दिवसांत शिर्डीतील महायुतीचा उमेदवार बदलला गेल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांच्यासह संजय राऊतांचा अडथळा ओलांडावा लागायचा असा आरोप होवूनही संयुक्त शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जाते. मात्र इतक्या मोठ्या पडझडीनंतरही शिवसेना उबाठा गटाने त्यातून कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नसल्याचे बबन घोलप यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याने उघड झाले. शिंदेगटात प्रवेश करण्यापूर्वी घोलप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे यांना भेटण्यासाठी दोन महिने प्रयत्न केले, मात्र नार्वेकर आणि राऊत यांनी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला. कदाचित ठाकरेंशी त्यांची भेट घडली असती तर त्यांचे पक्षांतर थांबवता आले असते अशीही चर्चा आत सुरु झाली आहे..

Visits: 330 Today: 1 Total: 1109848

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *