संगमनेरात ‘सत्यजीत’ नावाची ‘त्सुनामी’! विरोधकांच्या चारही मुंड्या चीत; पालिकेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नेमकी रणनिती, नेटके नियोजन, जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर नकारात्मक वातावरणालाही कलाटणी देत आमदार सत्यजीत तांबे यांनी पालिकेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करताना देदीप्यमान विजय मिळवला. साडेतीन दशकानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या नावाशिवाय लढल्या गेलेल्या या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने विरोधकांच्या चारही मुंड्या चीत केल्या. प्रभाग क्रमांक 13 मधील शिवसेनेच्या साक्षी सूर्यवंशी यांचा अपवाद वगळता पालिका सभागृहातून विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. पुढील पाच वर्षांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडलेल्या ‘संगमनेर 2.0’ या सकारात्मक संकल्पनेवर संगमनेरकरांनी विश्वास दाखवल्याचे या निकालातून स्पष्ट झाले असून ‘सत्यजीत’ नावाच्या ‘त्सुनामी’तून विरोधकांच्या मनसुब्यांचा अक्षरशः धुव्वा उडवत डॉ.मैथिली तांबे यांनी महायुतीच्या सुवर्णा खताळ यांचा तब्बल 16 हजार 408 मतांनी पराभव करीत ऐतिहासिक विजय मिळवला. सभागृहातील एकूण 30 सदस्यांमध्ये तांबे समर्थक योगेश उर्फ चिकू जाजू व जुलेखा पठाण या दोघा अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे.

वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरात परिवर्तन घडल्याने त्याचे प्रतिबिंब यंदाच्या पालिका निवडणुकीतही उमटतील असा बहुतेकांचा कयास होता. मात्र संगमनेरकरांनी सत्तांतरानंतर गेल्या वर्षभरात घडलेल्या विविध राजकीय घडामोडी, संघर्षाच्या गोष्टी, त्यातून वारंवार निर्माण होणारा कायदा व्यवस्थेचा प्रश्न, अलिकडच्या काळात अचानक चर्चा वाढलेले अमलीपदार्थ अशा कितीतरी नकारात्मक गोष्टींना गांभीर्याने घेताना आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘संगमनेर 2.0’ या कालबद्ध जाहीरनाम्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहीले. निवडणुकीदरम्यान व्हायरल झालेल्या काही ऑडियो व व्हिडिओ क्लिप्सही काही प्रमाणात संगमनेरकरांना विचार करण्यास भाग पाडणार्या ठरल्या.

दुसरीकडे विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव, नेहमीप्रमाणे काहींनी बजावलेली झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका आणि एकंदरीत नियोजन शून्य व्यवस्था या कारणाने सुरुवातीला महायुतीसाठी पोषक वातावरण असूनही विरोधकांना त्याचा लाभ घेता आला नाही. महायुतीत असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात संवादाचा अभाव निवडणूक निकालातून स्पष्टपणे समोर आला. जागा वाटपापासून सुरु झालेली धुसफूस शेवटपर्यंत कायम राहिल्याने त्याचाही परिणाम दिसून आला. शिवाय महायुतीचे बहुतेक उमेदवार सामान्य श्रेणीतील असल्याने खर्चाच्या बाबतीत त्यांची उंची थोडकी ठरली. निवडणुकीदरम्यान प्रचारातही पुढील पाच वर्षात संगमनेर शहरासाठी काय करणार यापेक्षा थोरात-तांबे यांच्या मागील कारकीर्दीवर शिंतोडे उडवण्यावरच विरोधकांचा ‘फोकस’ राहिल्याने संगमनेरकरांनी तो साफ नाकारल्याचे निवडणूक निकालातून ठळकपणे समोर आले.

या उलट आमदार सत्यजीत तांबे यांनी सत्ताधार्यांविरोधात नकारात्मक वातावरण असतानाही पालिका निवडणुकीचे नेतृत्व स्वीकारुन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक गोष्टीची आखणी केली. मागील तीन महिन्यांपासूनच त्यांनी जनसंपर्क आणि संवादावर भर देवून जनमानसाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. नकारात्मक गोष्टीवर सकारात्मकताच विजय मिळवू शकते या सूत्रावर विश्वास ठेवून त्यांनी ‘संगमनेर 2.0’ ही विकासाची कालबद्ध संकल्पना संगमनेरकरांसमोर मांडली. निवडणुकीनंतरच्या पहिल्या शंभर दिवसांत काय करणार, पुढील पाच वर्षात काय करणार याचे टप्पेही त्यांनी मतदारांना पटवून दिले.

प्रभागनिहाय उमेदवारांची निवड करताना त्यांनी चारित्र्यावर अधिक भर दिला. जुन्या-नव्यांचा योग्य मेळ बसवताना निवडून येणारा कोणताही नगरसेवक पालिकेच्या कामाचा ठेकेदार नसेल हा त्यांचा शब्द संगमनेरकरांना अधिक आश्वासक वाटला. एकीकडे विरोधकांकडून प्राथमिक चाचपणीही नसताना दुसरीकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी संपूर्ण शहरातील नागरीकांच्या दुबार भेटीसह उमेदवारांची नावेही निश्चित केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या नियोजनात संगमनेर सेवा समितीने सुरुवातीलाच आघाडी घेतली होती, ती शेवटपर्यंत कायम राहीली. प्रचारादरम्यान शहराच्या विकासासाठी प्रसंगी विरोधी आमदारांसोबत काम करण्याची त्यांची जाहीर तयारी मतदारांना भावल्याचेही डॉ.मैथिली तांबे यांना पडलेल्या एकूण मतांवरुन दिसून येते.

एकंदरीत प्रदीर्घकाळापासून असलेल्या सत्तेतून निर्माण झालेली नकारात्मकता, विधानसभा निवडणुकीनंतरच्या परिवर्तनाची पोषक पार्श्वभूमी असतानाही महायुतीला त्याचा फायदा घेता आला नाही. उमेदवारांची निवड करण्यापासून सुरु झालेला विस्कळीतपणा प्रत्यक्ष प्रचारातही दिसून आला. विकासापेक्षा मागील कार्यकाळातील उणीदुणी काढण्यावर आणि आरोप करण्यावरच विरोधकांचा भर राहिल्याने मतदारांनी त्यांच्या नकारात्मक राजकारणाला नाकारल्याचे दिसून आले. दुसरीकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘संगमनेर 2.0’ ही संकल्पना प्रभावीपणे मांडताना केवळ सकारात्मक गोष्टींवर भर दिला. या दरम्यान विरोधकांकडून होणार्या आरोपांनाही त्यांनी सक्षमपणे उत्तरे दिली. त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानात ‘सत्यजीत’ नावाची ‘त्सुनामी’ निर्माण होण्यात झाल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीचा निकाल संगमनेरच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हताश झालेल्या कार्यकर्त्यांना संजीवनी देणारा हा ऐतिहासिक विजय साकारताना आमदार सत्यजीत तांबे यांच्यातील नेतृत्वगुणांची झलक संगमनेरकरांना बघायला मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात ‘बाळासाहेब, सत्यजीत सारखा हिरा किती दिवस झाकून ठेवणार, आमची त्याच्यावर नजर आहे..’ असे वक्तव्य करण्यामागील अर्थ उलगडणारी संगमनेर नगरपालिकेची निवडणूक आगामी काळातील संगमनेरच्या राजकारणावर खोलवर परिणाम करणारी ठरणार आहे हे मात्र निश्चित.

