कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठक रात्रीतून ‘स्वीच ऑफ’! कोपरगाव, राहाता, शिर्डी व परिसरातील अनेकांची उडाली झोप

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कमी दरात स्टील, सिमेंट देतो असे सांगत ग्राहक व गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठक रात्रीतून ‘स्वीच ऑफ’ झाला. इचलकरंजी येथील कुटुंबासह तो परागंदा झाल्याने, पैसे गुंतवलेल्या कोपरगाव, राहाता, शिर्डी व परिसरातील अनेकांची झोप उडाली असल्याची चर्चा आहे. अद्यापपर्यंत पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही, हे विशेष आहे.

मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील रहिवासी असलेला हा महाठक 2009 मध्ये कोपरगाव तालुक्यातील एका संस्थेत कामाला होता. तेथे त्याने अनेकांशी ओळखी वाढविल्या. सुरुवातीला व्याजाने पैसे घेत, संबंधितांची रक्कम व्याजासह परत करत गेला. त्यानंतर तो नोकरी सोडून गावाकडे गेला. तेथे त्याला या रॅकेटमधील गुरू भेटल्याची चर्चा असून, त्याने या धंद्याची संपूर्ण माहिती त्याला दिली. तेथून त्याने कोपरगाव, राहाता, शिर्डी व परिसरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, गुंतवणूकदार, नागरिकांचा विश्वास संपादन करीत स्वस्तात सिमेंट, स्टील देण्याचा डाव टाकण्यास सुरवात केली.

एकाची टोपी दुसर्‍याला, दुसर्‍याची तिसर्‍याला असे करत त्याने अनेकांना मालदेखील पुरवला. नंतर ज्यांना माल नको अशा गुंतवणूकदारांना आकर्षित केले. महिन्याला पाच ते दहा टक्के परतावा दर तीन महिन्यांनी बिनबोभाट पोहोच केला. त्यातून अनेकजण या व्यवहारात गुंतले गेले. काही जणांनी नफा देखील मिळवला. मात्र, पैशाच्या लोभापायी पुन्हा गुंतवणूक करत गेले. अनेकांनी स्थावर मालमत्ता विकून पैसे गुंतवले. आज हा ठक ‘स्वीच ऑफ’ झाल्याने त्यांचा थरकाप उडाला आहे.

तक्रार कोण दाखल करणार?
अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार नोंदवली नाही. त्यामुळे आता त्या ठकाविरुद्ध कोणी आवाज उठवतो की नुकसान सहन करून सर्वजण गप्प बसणे पसंत करतात, याकडे कोपरगाव, राहाता, शिर्डी व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 115797

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *