सोनईतील घरफोडींप्रकरणी गुन्ह दाखल
नायक वृत्तसेवा, नेवासा
जुन्या वांबोरी रस्त्यावर असलेल्या सोनईतील दत्तनगर परिसरात सोमवारी (ता.26) पहाटे दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. संतोष कर्डिले यांच्या घरातून 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख 4 हजार रुपये चोरुन नेले तर घरातील चार मोबाईल तोडले. तसेच दीपक जाधव यांच्या घरातील एकूण 4 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 30 ग्रॅम चांदीचे पैंजण व रोख 9 हजार असा ऐवज चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशाप्रकारे 5 तोळे 9 ग्रॅम सोन्याचे दागिने, 30 ग्रॅम चांदीचे दागिने, 13 हजार रुपयांची रोख रक्कम अशी चोरी झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, दत्तनगर परिसरात राहत असलेले संतोष कर्डिले यांच्या घराच्या किचनचा पहाटे तीन वाजता दरवाजा तोडून दोन चोरट्यांनी लोखंडी टॉमी व लोखंडी कत्तीचा धाक दाखवत सर्व चार मोबाईल तोडून घरातील एक तोळा वजनाचे सोन्याचे नेकलेस, सहा ग्रॅमचे सोन्याचे कानातील वेल व रोख चार हजार रुपये चोरुन नेले. तसेच शेजारील दीपक जाधव यांच्या घरीही चोरी केली. चोरट्यांनी तेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, नऊ ग्रॅम वजनाचे कानातील वेल, दोन ग्रॅम वजनाची नाकातील नथ, अकरा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, आठ ग्रॅम वजनाच्या कानातील बाळ्या, तीन भार वजनाचे चांदीचे पायातील पैंजण व नऊ हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे जवळच्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम 392, 457, 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, सहाय्यक निरीक्षक रामचंद्र कर्पे, ज्ञानेश्वर थोरात यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास ज्ञानेश्वर थोरात हे करत आहे.