नेवाशात भाजप अंतर्गत वाद उफाळला
नायक वृत्तसेवा, नेवासा
एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षबांधणी व नेटवर्क निर्माण करत असतानाच नेवासा तालुक्यात मात्र भाजप अंतर्गत वाद उफाळून आला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे नुकतीच आढावा बैठक झाली. नेवासा तालुकाध्यक्षांनी पक्षविरोधी कारवाई करणार्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सायंकाळीच त्यांनी पत्रक काढून जिल्हा भाजपचे नेते अनिल ताके, माजी तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे, नेवाशाचे माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. दरम्यान, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रदेशाध्यक्षांना एकतर्फी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याने ही कारवाई माजी करण्यात आल्यासह त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले गेले.
या कारवाईनंतर तालुक्यात भाजपच्या निष्ठावंत गटात असंतोष निर्माण झाला आहे. ताके यांनी आपण पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांसमोर मुरकुटे यांच्या लीला मांडणार असल्याचे जाहीर करत, तालुक्यात पक्षाची पिछेहाट होणे अपमानास्पद असून, जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद न देता केवळ फक्त नातेवाईकांनाच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची मुरकुटे यांची कार्यपद्धती पक्षवाढीला खीळ घालणारी ठरल्याचा आरोप केला. तालुक्यातील विविध निवडणुकांत मुरकुटे यांनी बोटचेपी भूमिका घेत मुरकुटे यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यांचे हे सर्व उद्योग आपण पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिल्यानेच मुरकुटेंनी आमच्या विरोधात कारवाई केल्याचा आरोपही या नेत्यांनी केला. तालुक्यात ताके, मुरकुटे, लंघे, देसरडा असे चार गट पडले असले, तरी या कारवाईनंतर निष्ठावंतांनी भाजप नेते विठ्ठल लंघे, सचिन देसरडा या दोघांपैकी एकाला विधानसभेचा उमेदवार म्हणून मुरकुटे यांनी घोषित करावे, असे आवाहन करून त्यांच्यापुढे अडचणी निर्माण केल्या आहेत.