दोघा भावंडांनी जागवला सव्वाशे वर्षांचा इतिहास! रंगारगल्ली तालीमचा पुनर्जन्म; पारंपरिक व आधुनिक संसाधनांचा मेळ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पूर्वी गल्लोंगल्ली असलेल्या तरुणांच्या समूहाला सकाळ-सायंकाळ एकच नाद असायचा, शरीर कमवायचं. त्याकाळी आधुनिकतेचा स्पर्शही नसल्याने टीव्ही, मोबाईल तर दूरच वीज पुरवठ्याद्वारे उजळलेले घर श्रीमंताचे समजले जायचे. त्यामुळे लहान व किशोरवयीन मुलेही मैदानी खेळातच रमलेली दिसायची. शहरात त्यावेळी असलेल्या शासकीय रुग्णालयाशिवाय अभावाने खासगी दवाखाने असतांनाही संगमनेरकरांना आरोग्य सुविधांची फारशी गरज भासत नव्हती. गावातील तरुण आणि पौढांसाठी चोहोबाजूला एक-दोन नव्हेतर अर्धा डझनावर तालीम (व्यायामशाळा) होत्या. कालौघात त्या आता इतिहासात जमा झाल्या आहेत. आजची पिढी मैदानं, व्यायामशाळा यांना पाठ दाखवून मोबाईल आणि इंटरनेटच्या हौद्यात उतरल्याचे चित्र आज सर्वत्र दिसत आहे. एकीकडे आधुनिकतेमागे धावणारी पिढी पारंपरिक गोष्टींना दुय्यम ठरवित असताना संगमनेरातील दोघा भावंडांनी त्याला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांतून पडद्याआड गेलेल्या रंगारगल्ली तालीमचा पुनर्जन्म झाला असून सव्वाशे वर्षांचा इतिहास सांगणारी परंपरा पुन्हा जागृत झाली आहे. पारंपरिक आणि आधुनिक संसाधनांनी सुसज्ज असलेल्या या बल उपासणा केंद्राचे आज सायंकाळी लोकार्पण होत आहे.

अमृतवाहिनी प्रवरानदीच्या काठावर वसलेल्या संगमनेरचा इतिहास खूप मोठा आणि समृद्ध असा आहे. अगदी प्रागैतिहासातील प्रसंगांपासून ते स्वातंत्र्यलढ्यातील अनेक चळवळींपर्यंतच्या घडामोडींचे केंद्र राहिलेल्या संगमनेरला व्यायामशाळांचाही (तालीम) मोठा इतिहास आहे. दीड-दोनशे वर्षांपासून आत्ता-आत्तापर्यंत गर्दीने गजबजलेल्या व्यायामशाळा बघितलेली पिढी आजही आहे. तो काळही आधुनिकतेचा लवलेश नसलेला होता. भौतिक गरजा गावालाही नसल्याने अंग, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गोष्टी असलेला गृहस्थ सुखी मानला जायला. घरात जेमतेम कमावणारा एकच कर्ता असूनही अर्धा डझनावर संख्या असलेली कुटुंबेही त्यावर आनंदाने जगायची. गावात विजेचा संचारही नसल्याने सूर्यास्तानंतर बायाबापड्या सोडून सगळीच माणसं मोकळी व्हायची.

त्यामुळे तरुण वर्ग व्यायामशाळांमध्ये, लहान मुले मैदानात आणि वयोवृद्ध गावच्या देवळात असे दृश्य शहरात दिसायचे. गेल्या तीन-साडेतीन दशकांत जागतिकीकरणाने आपल्या या पारंपरिक गोष्टी हळूहळू मागे सरत गेल्या आणि त्यातील बहुतेक इतिहास जमाही झाल्या. माजी उपनगराध्यक्ष धनंजय डाके यांनी यापूर्वी अकोला वेस तालमीच्या विकासाचा भार पेलून तिला गतवैभव मिळवून दिले. आज या व्यायामशाळेत सकाळ-संध्याकाळ चाळीसहून अधिक तरुण पारंपरिक आयुधांचा वापर करुन घाम गाळीत आहेत. आता त्यात 126 वर्षांचा इतिहास सांगणार्‍या रंगारगल्ली तालीमची भर पडली आहे. कधीकाळी या तालमीत किसन सावजी, माधवनाना काजळे, गोविंदराव लोणारी, यशवंत काठे वस्ताद, शंकर आडकी यांच्या सारख्या अनेक तरुणांचे शरीर पीळदार बनविण्यात याच तालमीतल्या लालमातीचा वाटा.

त्यावेळी शहराच्या चोहोबाजूला म्हणजे नेहरुचौक-तेलीखुंट यामधील भागात आबासाहेब वस्ताद तालीम, चंद्रशेखर चौकातील साटम मठ येथील तालीम, अकोला वेस व त्यापुढे शारदा शिक्षण संस्थेच्या आवारातील हनुमान तालीम, पालिकेच्या पाठीमागील बाजूस असलेली संभाजी तालीम अशा अर्धा डझनहून अधिक ठिकाणी व्यायामशाळा होत्या. या प्रत्येक ठिकाणी लाकडाच्या साहाय्याने बनवलेले वेगवेगळ्या वजनाचे लोलक, डबल व सिंगलबार, जोर-बैठका इतकाच मर्यादित व्यायाम होता. याशिवाय व्यामशाळेच्या मध्यात खोदलेल्या आयाताकृती हौद्यातील लालमातीत उतरुन कुस्तीचे डावपेच आत्मसात होतं. दर शनिवारी तेल-गुळाचे पाणी मारुन मर्दाणी बनलेली हौद्यातील लाल रवाळमाती फावड्याच्या मदतीने खोदून काढणं म्हणजे मोठा परिश्रमाचा प्रकार. काही ठिकाणी आड्यापासून खाली चर्‍हाट बांधलेले असायचे, ते चढूच जाणेही संपूर्ण शरीराला व्यायाम करुन जायचे.

कालौघात आलेल्या आधुनिकतेने या सगळ्या गोष्टी मागे सरल्या. मोठा वर्ग व्यायामापासूनच दुरावला तर ज्यांना गरज भासली त्यांनी ‘जिम’चा पर्याय निवडला. त्यामुळे कधीकाळी शहरातील तरुणांपासून गृहस्थांपर्यंतच्या गर्दीने सकाळ-सायंकाळ फुलणार्‍या तालीम हळूहळू ओस पडू लागल्या आणि कालांतराने काळात सामावल्या. त्यातील 1898 साली आचप्पा आडकी यांच्या दातृत्त्वातून उभ्या राहिलेल्या या तालीमचा तब्बल सव्वाशे वर्षांनंतर ज्येष्ठ समाजसेवक जयवंत पवार व त्यांचे छोटे बंधू माजी नगरसेवक किशोर पवार यांनी पुनर्जन्म घडवून आणला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सततच्या त्यांच्या प्रयत्नांना अखेर आज श्रीराम जन्माच्या दिवशी यश आले असून काळाने पडद्याआड दडवलेली आचप्पा आडकी – रंगारगल्ली तालीम आजपासून पुन्हा तरुणांसाठी खुली झाली आहे.

जुनी इमारत पाडून त्याजागी लांबकुळ्या जागेत तीन मजल्यांवर बांधलेल्या या व्यायामशाळेच्या तळ मजल्यावर पारंपरिक तालीम व पूर्वीप्रमाणेच संसाधनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी असलेल्या जागेवरच हनुमानरायाची मूर्ती स्थापित करण्यात आली असून त्या पुढ्यात पारंपरिक हौद आणि त्यात खास कोल्हापूरहून मागवलेली लालमाती आहे. तालमीतून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जीना असून तेथे अत्याधुनिक संसाधनांचा भरमार असलेली आधुनिक व्यायामशाळा आहे. जयवंत व किशोर या पवार भावंडांनी काळाच्या आड गेलेल्या रंगारगल्ली तालमीला पुन्हा जीवंत करताना पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळही घातला आहे. त्यामुळे व्यायामापासून दूर गेलेली तरुण पिढी पुन्हा या शक्ती आणि बल देणार्‍या केंद्रांकडे वळतील अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. पवार भावंडांच्या या प्रयत्नाचे, सामाजिक दायित्त्वाचे संगमनेरातून कौतुक होत आहे.


संगमनेरच्या तालीम परंपरेला मोठे महत्त्व आहे. शहराच्या विविध भागातील तालमींमध्ये शरीर कमावलेल्या तरुणांनी त्याकाळी विविध ठिकाणचे कुस्त्यांचे फड गाजवण्यासह अगदी राज्य पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धांपर्यंत मजल मारली आहे. त्यावेळी तरुणांची ओळखही तालमीच्या नावावरुन होत असतं. बळकट शरीरयष्टी असणं ही त्यावेळच्या तरुणांची मानसिकता होती. आजमात्र तरुणपिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यात वाहत जात असताना धनंजय डाके, जयवंत पवार व किशोर पवार यांसारख्या समाजचिंतकांनी नवा इतिहास रचताना संगमनेरचा सव्वाशे वर्षांचा इतिहास जागवला आहे.

Visits: 66 Today: 1 Total: 405397

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *