टोमॅटोच्या बागा जगविण्यासाठी टँकरद्वारे घेताहेत विकतचे पाणी! पठारभागातील वास्तव चित्र; बाजारभावाच्या शंकेनेही शेतकरी चिंताग्रस्त

राजू नरवडे, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील टोमॅटो पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपळगाव देपा, मोधळवाडी व खंडेरायवाडी भागातील टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांवर ‘पुन्हा’ संकट कोसळले आहे. मोठ्या हिंमतीने उभे केलेले टोमॅटोचे फड जगविण्यासाठी वरुणराजाच्या अवकृपेने टँकरचे विकत पाणी घेण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. जर एवढा खर्च करुनही बाजारभाव मिळाले नाही तर पुन्हा आर्थिक खाईत लोटले जाण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोविडचे संकट चालू आहे. यामध्ये शेती व्यवसायाला देखील मोठा फटका बसला आहे. एकीकडे कोविड तर दुसरीकडे अवकृपा यामध्ये बळीराजा भरडला जात असल्याचे चित्र आहे. तरी देखील मोठ्या हिंमतीने आणि अपेक्षेने पिंपळगाव देपा, मोधळवाडी व खंडेरायवाडी दरवर्षीप्रमोण टोमॅटोचे पीक घेतात. त्यातून चांगले उत्पन्नही मिळते. परंतु, यंदा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांनी बागा उभा करण्यासाठी मोठा खर्च केला आहे. मात्र, वरुणराजाने हूल दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. यावर उपाय शोधून टँकरचे विकत पाणी घेवून बागा जगविण्यासाठी कंबर कसली आहे.

तब्बल दहा-बारा किलोमीटर अंतरावरून टँकरद्वारे पाणी वाहून आणायचे. त्यानंतर ते पाणी शेततळ्यात किंवा विहिरीत टाकायचे आणि ठिबकच्या सहाय्याने टोमॅटो पिकाला द्यायचे असा नित्यक्रमच बनला आहे. तर काही शेतकरी अक्षरशः तांब्याने झाडांना पाणी घालत असल्याचे भयान दृश्य चित्र दिसत आहे. मात्र, एवढ्या खस्ता खाऊनही जर बाजारभाव मिळाले नाही तर पुन्हा कर्जबाजारी होवू या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत. टोमॅटो उत्पादक शेतकरी दत्तात्रय सुखदेव गांजवे म्हणाले की, जवळपास दीड एकरावर टोमॅटोची लागवड केलेली आहे. परंतु, पावसाने उघडीप दिल्याने विकत टँकर घेऊन पाणी घालत आहे. तर भाऊसाहेब विष्णू गुंड म्हणाले, पावसाच्या भरवशावर एक एकरावर टोमॅटोची बाग उभी केली आहे. मात्र, ऐनवेळी पावसाने हूल दिल्याने गेल्या काही दिवसांपासून टँकरने विकत पाणी आणून घालत आहे.

पिंपळगाव देपा गावासह संपूर्ण परिसर टोमॅटोचे आगार म्हणून ओळखले जाते. काबाडकष्ट करून येथील शेतकरी दरवर्षी सोन्यासारखे टोमॅटोचे पीक घेतात. मात्र अद्यापही पाऊस न झाल्याने फड कसे जगवयाचे असा प्रश्न या टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे. परंतु, त्यांनी खचून जावू नये.
– किरण मिंढे (सदस्य, पंचायत समिती संगमनेर)

Visits: 10 Today: 1 Total: 117083

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *