देशातंर्गत इंधन संकटावर संगमनेरी ‘जुगाड’ भारी! गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद; ‘चुलीवरच्या वड्या’साठी मात्र खवय्यांची गर्दी ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आखाती देशांमध्ये सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे भीषण संकट उभे राहिले आहे. भारताचा या युद्धाशी थेट संबंध नसला, तरी इंधन आयातीसाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक इराणने रोखल्याने त्याचे गंभीर परिणाम आता देशांतर्गत बाजारपेठेवर दिसू लागले आहेत. भारताच्या एकूण गरजेपैकी 80 टक्के इंधन याच मार्गावरुन येत असल्याने पुरवठा साखळी पूर्णतः कोलमडली आहे. याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना आणि छोट्या व्यावसायिकांना बसला असून, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सरकारने तूर्तास थांबवल्याने हॉटेल उद्योग संकटात सापडला आहे.

संगमनेर शहरातही याचे पडसाद उमटले असून, अनेक नामवंत हॉटेल्स आणि हातगाडी चालकांनी गॅस अभावी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. मात्र, अशा या कठीण काळात संकटापुढे हात न टेकता, त्यावर मात कशी करावी, याचा वस्तूपाठ संगमनेरातील एका जिद्दी पाववडा विक्रेत्याने घालून दिला आहे. शहरातील नगरपालिकेजवळ राहणार्या सतीश महाले यांनी आपल्या ‘शिवशक्ति पाववडा’ या व्यवसायावर ओढवलेले गॅसचे संकट एका अनोख्या ‘जुगाडा’ने परतावून लावले आहे.

इंधन टंचाईमुळे गॅस मिळणे बंद झाल्यावर सतीश महाले यांचा व्यवसाय दोन दिवस ठप्प होता. हातावरचे पोट असल्याने व्यवसाय बंद ठेवणे परवडणारे नव्हते. अशा वेळी महाले यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक पद्धतीचा मेळ घालणारी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या ‘बॅटरीवरील आधुनिक चुली’चा वापर करण्याचा निर्णय घेतला. या चुलीमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जातो, मात्र आगीची धग आणि ज्वलन नियंत्रित करण्यासाठी एक छोटा पंखा बसवलेला असतो, जो बॅटरीवर चालतो. त्यामुळे धूर कमी होतो आणि गॅससारखीच प्रखर आचही मिळते.

एकीकडे गॅसअभावी शहरातील इतर खाद्यपदार्थांच्या बहुतेक गाड्या बंद असताना, दुसरीकडे सतीश महाले यांनी चक्क लाकडावर वडे तळण्यास सुरुवात केल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. विशेष म्हणजे, गॅसच्या आचेपेक्षा चुलीच्या मंद आणि नैसर्गिक आचेवर तळलेला पाववडा हा पूर्वीपेक्षा अधिक चवदार, कुरकुरीत आणि खमंग लागत असल्याच्या प्रतिक्रिया खवय्यांकडून मिळत आहेत. यामुळे त्यांच्या गाडीवर आता ग्राहकांची मोठी झुंबड उडत असून ‘संकटातच संधी’ कशी शोधावी, याचे जिवंत उदाहरण त्यांनी उभे केले आहे.

छोट्या व्यावसायिकांसाठी ‘पाथफाइंडर’ सतीश महाले यांनी लढवलेली ही शक्कल आजच्या अनिश्चिततेच्या काळात केवळ त्यांच्या कुटुंबाची रोजीरोटी वाचवणारीच नव्हेतर, गॅस मिळत नसल्याच्या कारणाने व्यवसाय बंद करुन बसलेल्या शेकडो छोट्या व्यावसायिकांसाठी ती दिशादर्शक ठरत आहे. हॉटेल चालक, खानावळी चालवणारे आणि हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणार्यांनी अशा पर्यायांचा विचार केल्यास त्यांचे आर्थिक नुकसान टळू शकते. महाले यांच्या या धाडसाचे आणि कल्पकतेचे संगमनेर शहरात सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या ‘संगमनेरी जुगाडा’ने खर्या अर्थाने इंधन संकटाला उत्तर दिले आहे.

जागतिक इंधन संकटामुळे देशात उद्भवलेल्या व्यावसायिक गॅस टंचाईवर संगमनेरातील एका पाववडा विक्रेत्याने नामी शक्कल लढवली आहे. सतीश महाले यांनी गॅसला पर्याय म्हणून लाकूड आणि बॅटरीवर चालणार्या आधुनिक चुलीचा वापर सुरु केला असून, त्यामुळे त्यांचा थांबलेला व्यवसाय तर सुरु झालाच, पण ‘चुलीवरचा वडा’ म्हणून त्यांच्याकडे ग्राहकांची मोठी झुंबड उडत आहे. त्यांच्या या कल्पकतेने अशा संकट समयी डोकं धरुन बसलेल्या इतर छोट्या व्यावसायिकांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

