संगमनेर तालुक्यातील संक्रमित गावांमध्ये झाली मोठी घट! 104 गावांमधील संक्रमितांची संख्या शून्य तर शहरासह 48 गावांमध्ये केवळ चौपन्न संक्रमित
नायक वृत्तसेवा, संगमनेर
चालू महिन्यात तालुक्याच्या रुग्णगतीत मोठी घट झाल्याने संगमनेरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अगदी चार रुग्णांपासून सुरु झालेले कोविडचे संक्रमण गेल्या सहा महिन्यांच्या काळात तालुक्यातील 89.41 टक्के गावांमध्ये पसरल्याने चार हजारांहून अधिक नागरिकांना कोविडची लागण झाली होती. मात्र आरोग्य यंत्रणांनी केलेल्या व्यापक परिश्रमांमुळे सद्यस्थितीत कोविडचा मुक्काम तालुक्यातील अवघ्या 28.24 टक्के गावांपर्यंतच मर्यादीत असून 104 गावांनी आपले शिवार ‘कोविड मुक्त’ केले आहे. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 95 टक्क्याच्या पुढे गेले असून मृत्यूदरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरने संगमनेरकरांना एकामागून एक दिलासे दिल्याचे दिसून येत आहे.
संगमनेर शहरातील तिघांसह आश्वी बु. येथील एकाच्या रुपाने गेल्या एप्रिलमध्ये तालुक्यातील संक्रमणाला सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील बहुतेक संपूर्ण भाग आणि त्यानंतर शहरालगत आणि तालुक्यातील एका एका गावात पाय पसरीत कोविडने सहा महिन्यांच्या कालावधीत शहरातील 1 हजार 161 जणांसह ग्रामीण भागातील 2 हजार 943 जणांना संक्रमित केले. दुर्दैवाने कोविडच्या संक्रमणात शहरातील बारा जणांसह तालुक्यातील 28 जणांना आपला बळी द्यावा लागला. गेल्या महिन्यात तालुक्याच्या रुग्णवाढीचा नवा उच्चांक कायम झाला होता. त्यासोबतच एकाच महिन्यात 20 जणांचे बळी गेल्याने ऑक्टोबरमध्येही हाच सिलसिला कायम राहील असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र या महिन्याने तो खोटा ठरवताना अगदी पहिल्या तारखेपासूनच तालुकावासियांना दिलासा दिला आहे.
गेल्या सहा महिन्यांचा विचार करता संगमनेर शहरातील जवळपास सर्वच क्षेत्रात पाय पसरणार्या कोविडने 1 हजार 161 शहरवासियांना बाधित केले होते. आजवर त्यातील 1 हजार 135 जणांनी विविध रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले व घर गाठले. आजच्या स्थितीत शहरात केवळ 14 सक्रीय संक्रमित रुग्ण आहेत. सध्याच्या अवस्थेत ग्रामीणभागाच्या तुलनेत शहरी रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने येत्या काही दिवसांत शहरी संक्रमण जवळपास थांबण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे दररोज नवीन भागातून मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याचे धक्के सहन करणार्या शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे तालुक्यातील 170 गावांपैकी कोविडने 151 गावे (89.41 टक्के) संक्रमित केली होती. मात्र स्थानिक प्रशासनाने तालुक्यात प्रादुर्भावाला सुरुवात होताच त्याच्या पायरीनिहाय नियोजन केल्याने मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवूनही त्यांना वेळीच उपचार मिळाल्याने आजच्या स्थितीत तालुक्यातील 2 हजार 775 रुग्णांनी उपचार पूर्ण करीत कोविडचा पराभव केला. विशेष म्हणजे जवळपास संपूर्ण तालुक्यात पसरलेला कोविडचा विळखा सोडविण्यातही ग्रामीणभागाला मोठे यश आले. त्यामुळे जवळपास 90 टक्क्यांवर संक्रमित झालेल्या तालुक्यात आज केवळ 28.24 टक्के (48 गावे) संक्रमित असून आज सक्रीय असलेले ग्रामीण क्षेत्रातील 140 रुग्ण या गावातीलच आहेत.
सद्यस्थितीत केवळ एकच रुग्ण असलेल्या गावांची संख्या 19 आहे, तर प्रत्येकी दोन रुग्ण असलेली बारा, तीन रुग्ण असलेली पाच, चार र्रग्ण असलेली पाच, पाच रुग्ण असलेली शून्य तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेली अवघी सात गावे आहेत. येत्या दोन दिवसांत यातील बहुतेक गावातील रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याने वरील चित्र आणखी समाधानकारक दिसणार आहे.
मागील महिन्याचा विचार करता सप्टेंबरमध्ये 52 रुग्ण दररोज समोर येत होते. त्यामुळे त्या एकट्या महिन्यातच तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 561 रुग्णांची भर पडली होती. गेल्या महिन्याची श्रृंखला या महिन्यातही कायम राहील असे वाटत असताना या महिन्याने मात्र अगदी सुरुवातीपासून संगमनेरकरांना दिलासा दिल्याने शहरासह तालुक्यातील कोविडचे संक्रमण नियंत्रणात आल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे.
प्रशासनाने आजवर एकूण 20 हजार 493 संशयितांची स्राव चाचणी केली, त्यातून 4 हजार 104 रुग्ण संक्रमित असल्याचे समोर आहे. या महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या सर्व प्रकारच्या चाचण्यांमधून 22.13 टक्के दराने, दुसर्या आठवड्यात 20.91 टक्के दराने, तिसर्या आठवड्यात 20.02 टक्के दराने तर चालू आठवड्यातही याच दराने रुग्ण समोर येत आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 13 हजार 807 जणांची स्राव चाचणी रॅपिड अँटीजेन प्रणालीनुसार, 4 हजार 2 जणांची चाचणी शासकीय तर 2 हजार 684 जणांची चाचणी खासगी प्रयोग शाळेकडून करण्यात आली. आजच्या स्थितीत 3 हजार 910 रुग्ण बरे होवून घरी गेले असून आज केवळ 154 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची गतीही आज 95.27 टक्के आहे.