भारतरत्न मौलाना आझादांचे सामाजिक ऐक्याचे विचार प्रेरणादायी ः आ. डॉ. तांबे यशोधन संपर्क कार्यालयात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जयंतीनिमित्त अभिवादन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबर सातत्याने योगदान देणारे व देश स्वातंत्र्यासाठी जीवनातील दहा वर्षे तुरुंगवास भोगून सामाजिक ऐक्याचा नवा मंत्र देणार्या भारतरत्न डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे सामाजिक ऐक्याचे विचार सदैव भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.

संगमनेरातील यशोधन संपर्क कार्यालयात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, सुरेश झावरे, इद्रीस शेख, असीफअली सय्यद, हनीफ शेख, सादिक तांबोळी, हुसेन शेख, गुलाब ढोले, जावेद शेख, असीफ शेख, ज्ञानेश्वर राक्षे, तात्याराम कुटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुष व क्रांतीकारक यांचे मोठे योगदान आहे. अबुल कलाम आझाद यांनी असहकार आंदोलन, चले जाव आंदोलन यामध्ये नेतृत्व केले. दहा वर्षे जीवनाची त्यांनी तुरुंगवासात काढली. भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम करताना विद्यापीठ अनुदान आयोग, साहित्य व ललित कला अकॅडेमी असे विविध साहित्य समृद्ध निर्माण करणार्या अकादमींची स्थापना केली. सातत्याने सामाजिक ऐक्य जोपासणार्या या राष्ट्रपुरुषांचे विचार प्रत्येकाने जोपासत लोकशाही टिकवण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले. तर नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, प्रत्येक राष्ट्रपुरुषांचे विचार हे सदैव भारतीयांसाठी प्रेरणादायी राहणारे आहे. मौलाना आझाद यांनी सामाजिक ऐक्याच्या विचारातून भारत देश एकसंघ ठेवण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे.
