सलग दुसर्‍या दिवशी विद्यार्थीनीवर जीवघेणा हल्ला! अल्पवयीन मुलीवर ‘अ‍ॅसिड’ फेकले; वडगाव पानमधील भयंकर घटना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याच्या कारणावरुन सोमवारी तालुक्यातील रणखांब येथील नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आता सलग दुसर्‍या दिवशी तशाच प्रकारची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. मात्र या घटनेत कोणा प्रेमवीराकडून नव्हेतर अज्ञात विकृताकडून अवघ्या इयत्ता सहावीत शिकणार्‍या चिमुरडीवर चक्क अ‍ॅसिड फेकण्यात आले असून त्यात तिचा चेहरा गंभीर भाजला आहे. या घटनेनंतर दुचाकीवरुन आलेला विकृत आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. या घटनेनंतर जखमी विद्यार्थीनीला लोणीला हलवण्यात आले असून हा प्रकार नेमका कशासाठी घडला याचाही पोलीस शोध घेत आहेत.


याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज (ता.17) सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगावपान मधील महादेवमळा रस्त्यावर घडली. या परिसरातील राहणारी ईश्‍वरी संजय डहाळे (वय 12) ही इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थीनी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे पायी आपल्या घराकडे निघाली होती. सदरील विद्यार्थीनी आपल्या घरापासून जवळपास पाचशे मीटर अंतरावर असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एका अज्ञात विकृताने तिच्या चेहर्‍यावर ‘अ‍ॅसिड’ फेकून तेथून पळ काढला. या प्रकाराने सदरील अल्पवयीन चिमुरडीचा चेहरा भाजल्याने तिच्या किंकाळ्यांनी परिसर हादरुन गेला.


तिचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी तिच्या दिशेने धाव घेतली मात्र तो पर्यंत तिच्यावर अ‍ॅसिड फेकणारा विकृत तेथून पसार झाला होता. या घटनेनंतर नागरिकांनी तालुका पोलिसांना कळवून तिला प्राथमिक उपचारांसाठी सुरुवातीला वडगावपानमधील खासगी रुग्णालयात व त्यानंतर लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तेथे सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. अ‍ॅसिड फेकीत या चिमुरड्या मुलीचा उजव्या बाजूचा चेहरा पूर्णतः भाजून निघाला असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी दिली. या घटनेने पसिरात मोठा संताप निर्माण झाला असून सलगच्या घटनांमुळे विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


ईश्‍वरी डहाळे ही विद्यार्थीनी मूळची नेवासा तालुक्यातील रहिवाशी असून तिच्या वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आईसह माहेरी वडगावपान येथे वास्तव्यास आहे. अतिशय गरीब कुटुंबातील या मुलीचे कोणाशीही कोणतेच वैर नसताना अशा निरागस आणि निष्पाप मुलीवर केवळ विकृत मनोवृत्तीने अ‍ॅसिड फेकण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात रोष निर्माण झाला आहे. घटनेनंतर तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीच्या शोधासाठी वडगावपान मधील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. याशिवाय पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे लोणीच्या रुग्णालयात तळ ठोकून आहेत. या घटनेने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या विकृतीला यमसदनी पाठवण्याची मागणी होत आहे.


सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तालुक्यातील रणखांब येथील एका 22 वर्षीय विद्यार्थीनीवर तिच्या घरात घुसून जनार्दन गोरक्ष साळवे (वय 25, रा.पिंपरणे) याने धारदार शस्त्राने हल्ला करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला व नंतर स्वतःही जीव देण्याच्या प्रयत्नात वार करुन घेत शेततळ्यात उडी घेतली होती. या घटनेतून तालुका सावरत असताना अवघ्या 24 तासांतच वडगाव पानमधील एका निष्पाप आणि निरागस मुलीवर अ‍ॅसिड फेक झाल्याने संगमनेर तालुक्यातील विद्यार्थीनींची सुरक्षा ऐरणीवर आली असून अशाप्रकारे विनाकारण अ‍ॅसिड फेकून विकृत आनंद घेणार्‍या आरोपीला गजाआड करण्याऐवजी त्याला थेट यमसदनी पाठवण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1559577

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *