अधेड वयाच्या नराधमाकडून चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न! जागृक महिलेच्या सतर्कतेने अनर्थ टळला; काहींकडून प्रकरण दाबण्याचा संतापजनक प्रयत्न..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वडगाव पानमधील बारा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर अज्ञाताकडून ‘अ‍ॅसिड फेक’ झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटण्याच्या आंतच संगमनेर शहरातूनही अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एकीकडे वडगावपानच्या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा आणि हल्लेखोराला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते भरउन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतानाच या आंदोलनस्थळापासून दहा किलोमीटर अंतरावर संगमनेर शहरात एका 27 वर्षीय नराधमाने अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर शारीरिक अत्याचाराचा प्रयत्न केला. एका सतर्क महिलेला ‘त्या’ विकृताच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिने ऐनवेळी आरडाओरड केल्याने मोठा ‘अनर्थ’ टळला. धक्कादायक म्हणजे हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर खोट्या प्रतिष्ठेचे अवसान आणून काहींनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी पीडितेच्या आईला पैशांचे आमिषही दाखवले गेले. मात्र आरोपीने यापूर्वीही अशाचप्रकारे तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याची माहिती असल्याने ‘त्या’ महिलेने आपल्या चार मुलींच्या सुरक्षेचा विचार करुन शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरुन पोलिसांनी विकृत मानसिकतेचा आरोपी युवराज सिताराम हासे याच्या विरोधात विनयभंग, हेतू पूरस्सर पाठलाग व पोक्सोतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर पीडितेच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपीला बेदम चोपल्याने त्यात तो जखमी झाला आहे, त्यामुळे पोलिसांनी त्याला केवळ नोटीस बजावून सोडून दिले. आरोपीने यापूर्वीही तीन अल्पवयीन मुलींशी असेच कृत्य केल्याचे फिर्यादी महिलेला माहिती असल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहून एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वीच या विकृताला गजाआड घालण्याची गरज आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार बुधवारी (ता.18) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणातील फिर्यादी 36 वर्षीय विभक्त महिला आपल्या चार मुलींसह मोलमजुरी करुन शहरालगतच्या एका वसाहतीत रहाते. या महिलेची सर्वात लहान मुलगी आठ वर्षाची असून रोजगारासाठी जाताना ती दररोज तिला दुसर्‍या भागात असलेल्या एका वसाहतीत राहणार्‍या आपल्या सहकारी महिलेच्या घरी सोडून नंतर त्या दोघीही सोबत जात असत. बुधवारी सकाळी नित्यनेमाने असेच घडले, पीडित मुलीची आई तिच्यासह सहकारी महिलेच्या घरी आले व तिला तेथून सोडून ‘त्या’ महिलेसह दोघी कामावर निघून गेल्या. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरात खेळणारी आठ वर्षांची ही चिमुरडी खाऊ आणण्यासाठी म्हणून परिसरातील एका दुकानात गेली.


अवघ्या सहा वर्षांचा हा निष्पाप, निरागस जीव रस्त्याने उड्या मारीत आनंदाने खाऊ घेण्यासाठी जात असताना युवराज सिताराम हासे या 27 वर्षीय अधेडाची नजर तिच्यावर पडली आणि त्याच्या मनातील विकृतीही जागली. त्याने त्या चिमुरडीचा हेतूपुरस्सर पाठलाग केला आणि खाऊ घेवून पुन्हा घराकडे निघालेल्या त्या इवल्याशा जीवला रस्त्यातील काटवनाचा निर्मनुष्य भाग पाहून तिला अक्षरशः फरफटत ओढीत नेले. मात्र म्हणतात ना, निरागस व निष्पाप बालकांच्या रक्षणासाठी कधीकधी देवही धावतात, त्याप्रमाणे पीडित मुलगी दुकानातून जात असताना तिचा पाठलाग करणार्‍या या विकृतावर एका महिलेला संशय आला. त्यामुळे तिने आपले संपूर्ण लक्ष त्याच्या हालचालीवर केंद्रीत केले होते.


हा भयानक प्रकार पाहून थरकाप उडालेल्या ‘त्या’ जागृत महिलेने क्षणाचाही विलंब न लावता काटवनाकडे धाव घेतली, तो पर्यंत या विकृताने त्या निरागस जीवाला निर्वस्त्र करुन तिच्याशी अश्‍लिल कृत्य करण्यास सुरुवात केली होती आणि या प्रकाराने प्रचंड भेदरलेला तो निष्पाप जीव मुसमुसून रडत होता. डोळ्यासमोर घडणारं ते संतापजनक दृष्य पाहून ‘त्या’ महिलेने रुद्रावतार घेतल्याने आरोपी तेथून पळून गेला. मात्र त्या महिलेच्या आवाजाने आसपासच्या नागरिकांनी काटवनाकडे धाव घेतल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली.


हा भयंकर प्रकार घडण्यापूर्वीच रोखणार्‍या त्या जागृत महिलेला आरोपीची ओळख असल्याने तिने प्रचंड घाबरलेल्या आणि सतत रडणार्‍या त्या लेकराला घेवून थेट तिच्या काळजी वाहक असलेल्या घराकडे धाव घेतली आणि घडला प्रकार सांगितला. त्यानंतर सदरील महिलेने पीडितेसह तिच्या आईच्या कामाच्या ठिकाणी जावून घडला प्रकार सांगितला, मुलीनेही त्या विकृताचे कृत्य आपल्या आईच्या कूशीत दडून रडतरडत सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या माऊलीने आपल्या दोघा भावांसह आरोपीच्या घरी जावून त्याला बेदम चोपले. याच दरम्यान परिसरातील काहींनी या विकृताच्या खोट्या प्रतिष्ठेचे अवसान उभे करुन पीडितेच्या आईवर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली.


त्यामुळे त्या महिलेवर मोठा दबाव निर्माण झाला. मात्र त्याचवेळी यापूर्वी अशाचप्रकारे तीन अल्पवयीन मुलींसोबतही त्याने असेच कृत्य केलेले असल्याने तिच्या मनात आपल्या मुलींच्या सुरक्षिततेची चिंता निर्माण झाली. मात्र पीडित मुलीला रोज ‘ज्यांच्या’ घरात सोडले जात त्या परिसरातील काहींनी आणलेल्या दबावातून सदर महिला हादरली. एका सामाजिक कार्यकर्त्याने दैनिक नायकला हा धक्कादायक प्रकार आणि त्यानंतर सुरु असलेले दबावतंत्र सांगितल्यानंतर दडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या या प्रकरणाचा आवाज थेट पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या कानापर्यंत पोहोचला आणि पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले.


पोलीस पथकाने घटनास्थळी जावून तात्काळ आरोपी युवराज सिताराम हासे या विकृताला ताब्यात घेतले, मात्र पीडितेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याने जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर फिर्यादीची प्रतिक्षा करीत पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. या दरम्यान पीडितेच्या आईवर आरोपीच्या वतीने काहींनी प्रचंड दबाव निर्माण केल्याने त्या प्रचंड घाबरल्या. मात्र दैनिक नायकसह ‘त्या’ सामाजिक कार्यकर्त्याने पाठी ठाम राहण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रात्री साडेदहा वाजता युवराज सिताराम हासे या नराधम विकृतावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 74, 78 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम 8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


आरोपी युवराज हासे पीडितेच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जखमी असल्याने पोलिसांनी तूर्त त्याला अटक करण्याचे टाळले असून चौकशीकामी हजर राहण्याची नोटीस बजावून एकप्रकारे अटकेपासून त्याला संरक्षणच दिले आहे. आरोपीकडून बुधवारी घडलेला प्रकार चौथी घटना असल्याचे फिर्यादी महिलेच्या बोलण्यातून वारंवार समोर आले आहे. त्याचा विचार करता अशा विकृतांना उघड झालेल्या त्याच्या चौथ्या विकृतीनंतर मुक्त ठेवणे म्हणजे समाजात चालता फिरता नराधम मोकळा ठेवण्यासारखे आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे सरासरी विनयभंगाचा प्रकार म्हणून न पाहता अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे. वडगावपानमधील ‘अ‍ॅसिडफेक’ प्रकरणाला 24 तास उलटत असताना आणि आरोपीच्या अटकेसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतानाच संगमनेर शहरात घडलेला हा प्रकार आणि त्यानंतर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न यामुळे मोठा रोष निर्माण झाला आहे.


या धक्कादायक आणि अतिशय संतापजनक घटनेतील 27 वर्षीय अधेड युवराज सिताराम हासे या विकृत मनोवृत्तीच्या आरोपीने बुधवारी केलेला प्रकार त्याची चौथी विकृती होती. यापूर्वी त्याने तिघा अल्पवयीन मुलींशी असेच कृत्य केल्याचे समोर आले आहे. मात्र प्रत्येकवेळी त्याचे नातेवाईक आणि परिसरातील काहीजणांकडून त्याच्या खोट्या प्रतिष्ठेचे अवसान उभे करुन, प्रसंगी पैशाचे आमिष दाखवून प्रकरणं दडपली गेली. यावेळीही तसाच प्रकार घडला. सुरुवातीला फिर्यादीने पोलीस ठाण्यात जावूच नये यासाठी दडपण आणण्यात आले. मात्र एका पत्रकारासह सामाजिक कार्यकर्त्याच्या आधाराने हा दबाव झुगारल्यानंतर फिर्यादी महिला पोलीस ठाण्यात असतानाही चक्क त्यांना 25 हजार रुपये घेवून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणला गेला. यावरुन या प्रकरणातील आरोपी गजाशिवाय बाहेर राहणं समाजासाठी, लहान मुलींसाठी किती घातक आहे हे स्पष्ट होते, याचे पोलिसांनी भान ठेवण्याची गरज आहे.

Visits: 5 Today: 5 Total: 1570325

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *