लग्नास नकार दिल्याने नर्सिंगच्या तरुणीवर प्राणघातक हल्ला! संगमनेर तालुक्यातील रक्तरंजीत घटना; एकतर्फी प्रेमातून विकृतीचा कळस..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे एकतर्फी प्रेमाच्या वेडातून एका 22 वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी (दि.16) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. नर्सिंगचे शिक्षण घेणार्‍या या तरुणीवर तिच्याच नात्यातील एका तरुणाने प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर आरोपीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत शेततळ्यात उडी घेतली, मात्र संतप्त ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून बेदम चोप दिला. या रक्ताळलेल्या थरारामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या घारगाव पोलिसांनी आरोपी जनार्दन गोरक्ष साळवे या ला ताब्यात घेतले असून हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीची प्रकृती गंभीर आहे.


याबाबत मिळालेल्या विश्‍वसनीय माहितीनुसार, जखमी झालेली तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत असून काही दिवसांपूर्वी ती पिंपरणे येथे आपल्या थोरल्या बहिणीच्या मदतीसाठी गेली होती. तिथे वास्तव्यास असताना बहिणीचा चुलत दीर जनार्दन गोरक्ष साळवे (वय 25) याची वक्रदृष्टी तिच्यावर पडली. त्याने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर’ असा तगादा लावत गेल्या आठ दिवसांपासून तिचा पाठलाग सुरु केला होता. मात्र, पीडितेने त्याला स्पष्ट शब्दांत नकार देत त्याच्याकडे दुर्लक्ष केले. हाच नकार जनार्दनच्या जिव्हारी लागला आणि त्यातूनच त्याने या तरुणीचा काटा काढण्याचे क्रूर कारस्थान रचले. पीडिता रविवारी (ता.15) आपल्या गावी रणखांब येथे परतली होती, मात्र विकृतीने पछाडलेल्या जनार्दनने थेट तिच्या घरापर्यंत तिचा मागोवा घेतला.


आज सोमवारी (ता.16) सकाळी साडेअकराच्या सुमारास सदरील तरुणी आपल्या घरात जेवण करत असताना आणि तिची आजी ओसरीत काम करत असताना, आरोपी जनार्दन साळवे दुचाकीवरुन तिथे पोहोचला. घरात प्रवेश करताच त्याने लपवून आणलेले धारदार शस्त्र उपसले आणि जेवणाच्या ताटावर बसलेल्या तरुणीवर बेसावध असताना एकामागून एक सपासप वार केले. तरुणीच्या किंकाळ्या ऐकून आजी धावत आली असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नातीला पाहून त्यांनी आरडाओरड केली. पकडले जाण्याच्या भीतीने नराधमाने स्वतःवरही वार करुन घेतले आणि तो जखमी अवस्थेत तिथून पळू लागला. मात्र, नागरिकांनी त्याला चारही बाजूंनी वेढल्याने त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या शेततळ्यात उडी घेतली.


विकृत आरोपी जनार्दनच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता त्याला शेततळ्यातून बाहेर काढले. त्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी त्याला यथेच्छ चोपत एका झाडाला बांधून ठेवले आणि तत्काळ घारगाव पोलिसांना पाचारण केले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीला तातडीने संगमनेरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 1553741

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *