जेऊर हैबती येथे अवैधरित्या उत्खनन; 14 जुलैला रास्ता रोको
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील जेऊर हैबती येथे मुरुम-मातीचे बेकायदा उत्खनन करून चोरी केल्याप्रकरणी तलाठी व कुकाणा मंडलाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल व ग्रामस्थांना अपशब्द वापरल्याबद्दल ताबडतोब निलंबित करावे. तसेच सदरच्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत चौकशी करुन कारवाई करावी. याबाबतचे निवदेन तहसीलदारांना देण्यात आले, असे न केल्यास नंदीवाला समाज व ग्रामस्थ 14 जुलै रोजी कुकाणा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फुलमाळी यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेऊर हैबती येथील गट क्रमांक 289 मध्ये घरकुले दिलेली असून त्या घरकुलांची नोंद झालेली आहे. समाजाचे देवस्थान म्हणून रामबाबा यांचे मंदिर हे घुगरे-म्हस्के वस्ती जवळील नदीतिरावर असून ती जागा इनाम आहे. मात्र, महसूल कर्मचारी हे उत्खनन करणारेचे गोलमाल अहवाल व पंचनामा करत आहे. हा पंचनामा समाजातील लोकांना व ग्रामस्थांना मान्य नाही. त्यामुळे कामगार तलाठी व मंडलाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबाबत ताबडतोब निलंबित करावे. आणि अवैध गौण खनिज उत्खननाबाबत चौकशी करुन कारवाई करावी. अन्यथा ग्रामस्थांसह समाज 14 जुलैला कुकाणा येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहे.